राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. सर्वात आधी या निकालाबद्दल भारतीय जनता पार्टीचे अभिनंदन केले पाहिजे. कारण अगदी चार महिन्यांपूर्वी असलेली विरोधातील परिस्थिती पलटवून ज्या पद्धतीने भाजपाने या निवडणुकीत कमबॅक केले, ते निश्चितच अभिनंदनीय आहे. या निकालांचे विश्लेषण करताना, विरोधी पक्षांना भाजपाची ताकदच समजलेली नाही, हे नीटपणे समजून घेतले पाहिजे. २०१४ पासून ज्या पद्धतीने भाजपा देशात आणि राज्यात निवडणुकांचे मॅनेजमेंट करते आहे, त्याचा शांतपणे अभ्यास केला पाहिजे, तसे जर केले नाही, तर यापुढेही हाती भोपळा येण्याशिवाय विरोधकांपुढे काहीही उरणार नाही.
काही मुद्दे समजून घेतले पाहिजेत
१. निवडणूक हा अत्यंत गंभीरपणे लढण्याचा विषय आहे आणि त्यासाठी खूपसाऱी पूर्वतयारी केली पाहिजे, हे भाजपाला व्यवस्थित माहिती आहे. केवळ जाहीर सभा घेऊन आणि विरोधकांवर नुसतीच आगपाखड करून निवडणूक जिंकता येत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करावे लागते. वेगवेगळ्या संघटना, समाजावर प्रभाव पाडू शकणारे घटक, विविध स्तरावरील बैठका, कार्यकर्त्यांची अनेकस्तरिय यंत्रणा या सर्वांचा पद्धतशीरपणे उपयोग करून अपेक्षित यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात. गेल्या निवडणुकांमध्ये काय झाले, कुठे चूक झाली, याची खूप तटस्थपणे माहिती घेऊन त्यावर उपाय शोधले जातात.
२. नुसताच विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक जिंकता येत नाही. त्याला भावनिक मुद्दयांची जोड द्यावीच लागते. त्याचाही खुबीने वापर भाजपाकडून केला जातो. ‘एक है तो सेफ है’ यासारखे प्रचारात उपस्थित केले जाणारे मुद्दे याचाच भाग. विकास ही संकल्पना सापेक्ष आहे. त्यामुळे त्यावरून निवडणुकीत मते आपल्या पारड्यात घेता येत नाही. त्यासोबत लोकांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी भावनिक आवाहनही करावे लागते, ज्यावर भाजपाकडून काम केले जाते. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘मोदी है तो मुमकीन है’ या सारखी वाक्ये हा त्याचाच एक भाग आहे.
३. एका राज्यातील निवडणूक असली तरी इतर राज्यातील स्थानिक नेते, प्रादेशिक नेते यांना पद्धतशीरपणे त्या राज्यातील निवडणुकीसाठी जबाबदारी देऊन उतरवले जाते. यातील अनेक नेते हे संबंधित मतदारसंघांमध्ये जाऊन काम करतात. त्यांचे काम अनेकांना माहिती पण नसते. पण जाहीरपणे याची कुठलीही वाच्यता न करता शांतपणे विविध समाजघटकांना भेटून त्यांच्यापर्यंत आपले मुद्दे प्रभावीपणे पोहोचविणे, त्या मतदारसंघात कोणते मुद्दे परिणामकारक ठरत आहेत, त्यावर तात्काळ काय उपाय योजले पाहिजेत, यावर वरिष्ठांपर्यंत माहिती देणे, हे सगळे खूप नेमकेपणाने केले जाते. ‘चार दिवस आला आणि मौजमजा करून गेला’, असे अजिबात होत नाही. अनेक मतदारसंघांमध्ये तर संबंधित राज्यातील नेत्याची भाषा समजणाऱ्या त्या मतदारसंघातील व्यक्तीला त्याच्यासोबत फिरायला लावले जाते. जेणेकरून व्यवस्थितपणे संवाद घडावा, याकडे लक्ष दिले जाते.
४. मतदारयादीवर खूप बारीकपणे काम केले जाते. यादीप्रमुख त्यासाठी मेहनत घेत असतो. मतदानाच्यादिवशी टक्का वाढावा, यासाठी तो स्वतःहून प्रयत्न करत असतो. त्यातही ज्यावेळी आपला पक्ष अडचणीत असल्याचे जाणवते, त्यावेळी तो अधिक मेहनत घेऊन आपल्या यादीतील अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, यासाठी प्रयत्नशील असतो. वरवर हे खूप सोपे वाटत असले, तरी वास्तवात ते तसे नक्कीच नाही.
५. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासून ते जाहीर झाल्यानंतरही वेगवेगळ्या तटस्थ यंत्रणांमार्फत सर्वेक्षण करून काय स्थिती आहे. कुठे कमी पडतो आहे, याची सविस्तर माहिती घेतली जाते. त्याप्रमाणे रणनिती आखून तेथील मतदान आपल्या बाजूने फिरविण्यासाठी कोणत्या नेत्याची सभा कशी घेतली जाईल, याचाही विचार केला जातो आणि त्याची अंमलबजावणीही केली जाते.
६. सोशल मीडियावर आपल्या पक्षाची बाजू मांडतील, आपल्या विचारांना पुढे घेऊन जातील, अशांना हेरून त्यांच्यामार्फत छोट्या छोट्या पातळीवर विरोधी विचारांच्या युजर्सच्या मुद्द्यातील हवाच काढून टाकली जाते. अभ्यासक, पत्रकार, लेखक असे अनेक जण या यंत्रणेमध्ये स्वतःहून किंवा कोणाच्यातरी सांगण्यावरून काम करीत असतात. सामान्य लोकांच्या मनात विरोधकांबद्दल शंका उपस्थित करण्याचे काम यामार्फत केले जाते.
७. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीत विजयासाठी कोणताही कटू निर्णय घ्यायला अजिबात मागे पुढे पाहिले जात नाही. मोठ्या नेत्यांना तिकीट नाकारले जाते, विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाते, नाराजांनी प्रचारात गतीमान व्हावे, यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केले जातात. पक्षाचा विजय सर्वात महत्त्वाचा, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा दुय्यम या रितीने नियोजन केले जाते.
८. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना सातत्याने विविध माध्यमातून आपली बाजू, आपला संकल्प मतदारांपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जाते. लोकांनी माध्यम बदलले, तरी भाजपाचे कॅम्पेन सतत त्यांच्या मागे राहते. वृत्तपत्रे, टेलिव्हिजन, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया सर्वांवर आपल्या कॅम्पेनचा वरचष्मा राहिल, याकडेही लक्ष दिले जाते.
९. हे आणि यासह इतर अनेक गोष्टी केल्या गेल्यानंतर बरेचवेळा विजय मिळतो, पण काहीवेळा पराभवही होतो. पराभव झाला म्हणून खचून न जाता तातडीने उपायांवर काम केले जाते. विविध यंत्रणा त्यासाठी कार्यान्वित होतात आणि पुढचे नियोजन केले जाते.
आधी म्हटल्याप्रमाणे निवडणूक ही गंभीरपणे लढण्याची प्रक्रिया आहे. उमेदवार दिले, जाहीर सभा घेतल्या म्हणजे आता लोक आपल्याला मतदान करतील, अशी भाबडी आशा ठेवण्याचे दिवस कधीच मागे सरले आहेत. यशाची पायरी चढायची असेल, तर नियोजन जितके नेमके असेल तितके चांगले. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष या सर्वच आघाड्यांवर दूर दूरपर्यंत मागे आहेत हे आजच्या निकालांवरून दिसले. स्वतःमध्ये बदल करायचे सोडून ईव्हीएमला दोष देण्याने काहीच हाशील होणार नाही. पुढचा पराभव टाळायचे असेल तर आपल्या प्रतिस्पर्ध्याची ताकद आधी ओळखली पाहिजे. जेव्हा ताकद समजेल, त्यावेळी टक्कर देण्यासाठी रणनिती आखता येईल. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून असे काहीच झाल्याचे दिसले नाही. जोपर्यंत सत्ताधाऱ्यांना असलेला पर्याय मतदारांना तुल्यबळ वाटत नाही, तोपर्यंत ते तो पर्याय निवडत नाहीत. सध्यातरी भाजपा-महायुतीला पर्याय म्हणून विरोधी पक्ष ताकदवान असल्याचे मतदारांना वाटत नाही, हाच या निवडणुकीचा साधासोप्पा अर्थ आहे.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”