Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर राजकीय समीकरण बदलले आहेत. यंदा नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघात काही ठिकाणी पारंपरिक तर काही मतदारसंघात दुरंगी, तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. आणि अशीच एक दुरंगी लढत आपल्याला सिन्नर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.
सिन्नर विधानसभा मतदारसंघ एक असा मतदारसंघ जिथे कुठल्याही पक्षाकडे नव्हे तर व्यक्तीकडे पाहून त्याला निवडून दिलं जातं. लोकसभा निवडणुकीत कायम असलेल्या निर्णायक भूमिका बजावणारा मतदारसंघ म्हणून सिन्नर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात आतापर्यंत कोकाटे आणि वाजे या दोन घराण्यांमध्येच राजकीय लढत पाहायला मिळाली. परंतु आता या दोघांमध्ये तिसऱ्या नेतृत्वाने एक जोरदार एन्ट्री घेतली आहे त्यांचं नाव आहे उदय सांगळे. सिन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे विरुद्ध शरद पवार गटाचे उदय सांगळे अशी एक लढत आपल्याला दिसून येणार आहे. त्यामुळे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचं समीकरण कसं असेल? आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्का बसणार बसणार का?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयात सिन्नरने सिंहाचा वाटा उचलला. आता सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाने उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली आहे. सांगळे यांच्या प्रवेशामुळे ही लढत चुरशीची होणार आहे. तर या मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात ३ लाख २० हजार ४०९ मतदार आहेत.
यंदाच्या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाने माणिकराव कोकाटे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली. तर सिन्नरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली होती. सिन्नरच्या उमेदवारीसाठी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्यासह काहीजण इच्छुक होते. लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नरमधून सर्वाधिक म्हणजे सुमारे सव्वा लाखाचे मताधिक्य घेतले होते. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही जागा सुरक्षित मानली जात होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने उदय सांगळे यांना उमेदवारी जाहीर केली. आता सिन्नरमध्ये उदय सांगळे विरुद्ध माणिकराव कोकाटे असा सामना पाहायला मिळणार आहे.
काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shiv Sena) या दोन्ही पक्षाचं सिन्नर विधानसभा मतदारसंघात वर्चस्व राहिलंय. २०१४ विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी शिवसेनचा भगवा डौलाने फडकवला. काँग्रेस, शिवसेना असा प्रवास करून भाजपमध्ये (BJP) दाखल झालेल्या माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा २० हजारांनी पराभव केला होता. २०१९ सालच्या निवडणुकीत या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव कोकाटे यांनी शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांचा २०७२ मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. त्यामुळे सिन्नर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्का बसणार बसणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…