२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेलं एक भाषण बरंच प्रसिद्ध झालं होतं. त्यात देवेंद्र फडणवीसांनी “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” असं म्हणत निवडणुकीतील विजय पक्का असल्याचा दावा केला होता. पुढील अनेक प्रचारसभांमध्ये सातत्याने फडणवीसांनी याच उक्तीचा पुनरुच्चार केला आणि अखेर त्यांचा हा दावा खरा ठरला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ चा निकाल काल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला आणि पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले.
लोकसभेत नरेंद्र मोदींना बसलेल्या धक्क्याचा बदला आता विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी घेतला, असं या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहून म्हणता येईल. पूर्वी एक घोषणा फारच प्रसिद्ध झाली होती आणि ती म्हणजे केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र. यंदाच्या निकालानं पुन्हा एकदा नरेंद्रचा बदला देवेंद्रने घेतला असा मेसेज राज्यात गेला. लोकसभेला सेट केलेलं फेक नरेटिव्ह आठवत असेल तर ‘संविधान खतरे मे है’ असं फेक नरेटिव्ह लोकसभेला सेट केलं गेलं आणि फेक नरेटिव्हच्या आधारे लोकसभा लढवली गेली. त्याचा फटका महायुतीच्या तीनही पक्षांना म्हणजे भाजप शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांना बसला होता आणि जो मतदारसंघ हक्काचा होता अशा राज्यातल्या अनेक मतदारसंघात भाजपला आणि पर्यायाने मोदींच्या ४०० पारच्या नाऱ्याला फटका बसला होता. महाराष्ट्राचा जो मतदार भाजपला मतदान करत होता तोही भाजपच्या विरोधात गेला आणि मग महायुतीला १७ जागांवरती समाधान मानावं लागलं होतं. हा पराभव नरेंद्र मोदीच्या भाजप आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांना चांगला झोमला होता मग याचा स्पीड असाच राहिला तर विधानसभासुद्धा गमवावी लागेल हे फडणवीसांच्या ध्यानी आलं होतं, मग त्यांनी या पराभवाची कारणीमीमांसा करायला सुरुवात केली.
लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. समोर आव्हान होतं शरद पवारांसारख्या मुरलेल्या नेत्याचं आणि धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंचं. मात्र कार्यकर्ते आणि साथीदारांच्या मदतीने फडणवीसांनी राज्य पुन्हा पिंजून काढलं आणि शिंदेच्या साथीनं आणि अजित पवारांच्या साथीनं मग ‘लाडकी बहीण योजना’ राबवून महिलांना विश्वास दिला आणि आपल्या अभ्यासाच्या जोरावर मग फडणवीसांनी शरद पवार, मनोज जरांगे पाटील अशी आव्हान पेरली. राज्यात भाजप आणि महायुतीचा आकडा ‘न भूतो न भविष्यती’ असा पोहोचला आणि देवेंद्र फडणवीस ‘क्या चीज है’ हे त्यांनी राज्याला दाखवून दिलं. महत्त्वाचं म्हणजे जे शरद पवार यांच्याशी थेट सामना होता त्या पवारांची पॉवर राज्यात दिसलीच नाही त्यामुळे लोकसभेतल्या नरेंद्रचा बदला विधानसभेत देवेंद्रने घेतला हे विधान आज राज्यात पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अजित पवार यांना महायुतीमध्ये का घेतलं या निर्णयाबाबत पटवून सांगितलं. मतांचं गणित समजावून सांगितलं आणि संघाला विश्वासात घेऊन विधानसभेची तयारी सुरू केली त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विभागनिहाय बैठका झाल्यानंतर बूथ निहाय बैठका घेऊन त्यांच्या तयारीवरती जातीने लक्ष ठेवलं.
कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो ही बाब त्यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या मनावरती बिंबवली आणि याच कार्यकर्त्यांच्या जोरावरती आपल्याला निवडणूक लढवायची हा संदेश पार्टीत पोहोचवला. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले, बरं ते कामाला लागले ते जून महिन्यापासूनच. निवडणूक जाहीर होण्याची त्यांनी वाट पाहिली नाही याशिवाय निवडणुकीला सामोरे जाताना महायुती म्हणून सामोर जायचं असंही त्यांनी ठरवलं. मुख्यमंत्री पदाचा निर्णय निकालानंतर घेऊ असं ठरवल्यामुळे महायुतीतल्या कोणत्याही नेत्याने वाचाळ बडबड न करता मुख्यमंत्री पदावरती दावा ठोकला नाही. लहान सहान नेत्यांनी काही विधान केली सुद्धा असतील पण त्यामुळे महायुतीवरती परिणाम झाला नाही. त्याच्या उलट चित्र हे महाविकास आघाडीत दिसून आलं होतं. त्यामुळे जनतेमध्ये मनात महाविकास आघाडीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ही बाब फडणवीसांनी टाळली ‘एकीच बळ मिळते फळ’ ही म्हण महायुतीच्या एकत्रित प्रयत्नात दिसून आली आणि त्याला साथ मिळाली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची.
देवेंद्र फडणवीसांच्या या फोकस धोरणामुळे आज महायुतीने २०० चा आकडा पार केलाय तर एकट्या भाजपला १२५ च्या आसपास जागा मिळणार असं चित्र स्पष्ट झालंय.२०२९ मध्ये ‘एक देश एक निवडणूक’ हे सूत्र राबवलं जाण्याची दाट शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे सरकार आणणे गरजेचे आहे ही बाब भाजपच्या नेत्यांना पटल्यामुळेच त्यांनी यावेळी विधानसभेत कोणतीही कसर सोडली नाही. भाजपसमोर २०२९ ची निवडणूक होती ही बाब आजच्या आकडेवारीवरून लक्षात येते तर महाविकास आघाडीसाठी यंदाचीच निवडणूक ‘करो या मरो’ ची होती. त्यामुळे धोरण आखताना त्यांच्याकडून गल्लत झाली आणि तिथेच देवेंद्र फडणवीसांचा विजय झाला.
हे ही वाचा:
Match Preview India vs Australia Virat Kohli च्या धावांचा दुष्काळ संपणार का ?
शरद पवारांचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने मारली बाजी तब्बल इतक्या जागांवर मिळवला विजय…