महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे २०२४ चे वारे वेगाने वाहू लागले आहे. महायुती आणि महविकास आघाडीकडून उमेवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. आरोप – प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधक करत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल यवतमाळच्या वणी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून दाखल झाले. हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच उद्धव ठाकरे यांच्या बॅगची निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली. त्यांची बॅग तपासल्याने उद्धव ठाकरे चांगलेच संतापले. त्या तपासणीचा व्हिडीओ त्यांनी काढला आणि तो व्हिडीओ प्रसारित केला.माझी बॅग तपासली तशी सत्ताधाऱ्यांची देखील बॅग तपासा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय.
रोहित पवार म्हणाले की,विरोधकांच्या बॅगा तपासायला लावणार हे द्वेषाचे राजकारण आहे. बॅगा तपासणारे कर्मचारी मध्य प्रदेशातील होते. राज्यात इतकी बेरोजगारी असताना बाहेर राज्यातले लोक नोकऱ्या मिळवतात, असा टोला रोहित पवारांनी महायुती सरकारला लगावला आहे. तर विरोधकांनी सत्तेचा गैरवापर करत काहीही करू देत निकालानंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. मात्र महायुतीकडून जे चाललंय ते नाही, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधलाय. ते म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचं सरकार पाडलं. त्यामुळे मला कोणी हलक्यात घेऊ नये, असं म्हटलं आहे. यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून एकनाथ शिंदे यांनी आपल्याच मित्र पक्षाला असं म्हटले असावेत. कारण ज्या प्रकारे भाजपमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार निवडून येऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत, त्यावरून शिंदे यांनी असं म्हटलं असावं, असा टोला रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा प्रकार घडल्यानंतर राज्यभरातून या घटनेच्या विरोधात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आता रोहित पवार यांनी देखील दानवे यांच्यावर टीका केली असून भाजपच्या नेत्यांमध्ये अहंकार आणि पैशाची मस्ती असल्याचे म्हटले आहे. लोकसभेमध्ये त्यांची ही मस्ती जनतेने जिरवली आहे आणि आजही त्यांचा मुलगा ज्या ठिकाणी निवडणूक लढवतोय त्या ठिकाणची जनता देखील त्याची मस्ती उतरवतील, असे रोहित पवार यांनी रावसाहेब दानवेंना टोला लगावलाय.