spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे यांचा उबाठा गटाला ‘जोर का झटका’…

मतदानाच्या बरोबर एक दिवस आधी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक दिवस बाकी आहे. उद्या २० नोव्हेंबरला मतदान हणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. काल म्हणजेच १८ नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजत प्रचार तोफा थंडावल्या. त्यानंतर कल्याण डोंबिवली मध्ये एक मोठी घडामोड घडली. मतदानाच्या बरोबर एक दिवस आधी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

डोंबिवलीतील उबाठा गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उबाठा गटाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केले होते. शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उबाठा गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपले काम सुरू ठेवले. मात्र असे असूनही विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाने पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते पक्षनेतृत्वावर नाराज झाले होते. अखेर व्यथित होऊन त्यांनी उबाठा गटाच्या सर्व पदांचा राजीनामाही दिला होता. त्यानंतर आज संध्याकाळी 5 वाजता शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या बाळासाहेब भवनात येऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

गेली अनेक वर्षे आपण चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या लोकांसोबत काम करत होतो. मात्र सच्चा शिवसैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून आता काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान वाटत असल्याचे मत थरवळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

तर सदानंद थरवळ हे शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून गेली कित्येक वर्षे आम्ही सगळ्यांनी मिळून पक्षात एकत्रच काम केले होते. डोंबिवली मधील सर्वसामान्य लोकांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. डोंबिवली मध्ये काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या होत्या, आज त्यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकाचा आणि त्यांचा मुलगा अभिजितचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत असल्याचा विशेष आनंद मला होतो आहे. आता पुन्हा एकदा त्याच जोमाने आम्हाला पक्षवाढीसाठी एकत्र काम करता येईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. थरवळ पिता पुत्रांच्या शिवसेना प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीत डोंबिवली शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि महायुती अधिक बळकट झाली असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तर या पक्षप्रवेशामुळे मतदानाला अवघा एक दिवस बाकी असताना एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला ‘जोर का झटका’ दिला असल्याची चर्चा रंगली आहे.

हे ही वाचा:

मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss