लोकसभा निवडणुकीपासूनच सर्वाधिक चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघ. बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असल्याने इथले राजकारण कायमचं धगधगते राहिले आहे. या विधानसभा निवडणुकीत पुंरदरमध्ये तिरंगी लढत होतेय. महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना ऐनवेळी एबी फॉर्म दिल्याने महायुतीत तिढा निर्माण झाला. खरंतर झेंडे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. तसे त्यांनी प्रयत्नही केले होते. मात्र, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटल्याने झेंडे यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष लढण्याचा निर्धार केला. अशातच महायुतीत असलेल्या अजित पवार गटाकडून संभाजी झेंडे यांना एबी फॉर्म दिल्याने महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण असा पेच निर्माण झाला आहे ? संभाजी झेंडे हे गेली १५ वर्षे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसे ते प्रयत्नही करत होते. परंतु, आघाडी धर्म असल्याने त्यांना संधी मिळत नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत झेंडे हे इरेला पेटले असून, आमदारकी लढणारच, असा इरादा त्यांनी पक्का केलाय. झेंडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांना फटका बसण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची मतं विभागली जाण्याची शक्यता आहे. नाही म्हटलं तरी दिवे पंचक्रोशीत झेंडेंचा दबदबा आहे. घरचा उमेदवार म्हणून दिव्यातून झेंडेंना मतदान होण्याची शक्यता आहे. तसेच तालुक्यातील विभागलेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाची मते झेंडेंकडे जाऊ शकतात. त्यामुळे संजय जगताप यांना निवडून येण्यासाठी लागणारी काही मते विभागली जात असल्याने याचा अप्रत्यक्ष फायदा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांना होण्याची शक्यता आहे. तसे पाहायला गेले तर शिवतारे हे पवार विरोधी आहेत. पुरंदरमध्ये पवार विरोधी मतदारांची संख्या मोठी आहे. तसेच तालुक्यातला एक गट लोकसभेला सुप्रिया सुळे तर विधानसभेला विजय शिवतारे यांना मतदान करणारा आहे. त्यामुळे झेंडे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर याचा फटका संजय जगताप यांना बसण्याची शक्यता आहे.
पुरंदर विधानसभा मतदारसंघात सध्याच्या घडीला तरी अनिश्चिततेचे वातावरण आहे. एकीकडे संजय जगताप हे जरी विद्यमान आमदार असले, तरी त्यांना आपल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात फारशी चुणूक दाखवता आली नाही. संजय जगताप हे महाविकास आघाडीच्या काळात सत्तेतले आमदारही राहिले आहेत. त्याकाळातही भरीव अशी विकासकामं मतदारसंघात आणता आली नाहीत. गाव खेड्यातील काही समस्या सोडवल्या खऱ्या पण विधानसभा निवडणुकीत जिंकून येण्याजोगी ती कामं पुरेशी नाहीत.
दुसरीकडे माजी मंत्री राहिलेले विजय शिवतारे हे संजय जगताप यांना आव्हान देणार आहेत. शिवतारे यांच्यासाठीही ही निवडणूक फारशी सोपी नाही. २०१९ला संजय जगताप यांनीच शिवतारेंचा पराभव करत पुरंदरवर झेंडा रोवला होता. शिवतारेंकडे विकासाचे मुद्दे असले तरी जनसामान्यांवर त्याचा फारसा प्रभाव असल्याचा दिसून येत नाही. गेल्या २ निवडणुकीत गुंजवणी प्रकल्पाचा मुद्दा घेऊनच शिवतारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. २०१४ ला जितका हा मुद्दा गाजला, तितका प्रभाव गेल्या म्हणजेच २०१९च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला नाही. या निवडणुकीतही शिवतारे हाच मुद्दा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पुंरदर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि राष्ट्रीय बाजार हा देखील शिवतारेंचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हे मुद्दे कितपत लोकांच्या पसंतीस पडतील, याचा अंदाज लावणे कठीण आहे. दोन्ही उमेदवार हे आजी माजी असल्याने पुरंदरचा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यात दोन्ही नेते अपयशी ठरले आहेत. शिक्षण क्षेत्रातही म्हणावी तशी कामगिरी या दोन्ही नेत्यांना त्यांच्या कार्यकाळात करता आली नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवारांपैकी कुणाचं पारडं जड आहे हे सांगणं सध्याच्या घडीला कठीण आहे.
हे ही वाचा:
Ajit Pawar यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “मी बारामतीतून लढणारच नव्हतो…”
बँकेत गैरव्यवहार झालाच नाही; पोलिसांची दुसर्यांदा कोर्टात धाव