गेल्या अनेक दिवासांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला जात होता. अखेर काल २० नोव्हेंबरला या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे या निवडणुकीसाठी मतदानही केले. अशातच ठाणे जिल्ह्यात १८ मतदारासंघांमध्ये मतदारांचा बुधवारी सकाळपासूनच उत्साह दिसून आला. अनेक मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत मतदानाचे प्रमाण अधिक दिसून आले.
ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्व मतदारसंघांत एकूण २४४ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. मतदारसंघात ६ हजार ८९४ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. काल संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत ठाणे शहर मतदार संघात ५२.४१ टक्के मतदान झाले. या मतदार संघात तिहेरी लढत झाली, भाजपचे संजय केळकर, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे राजन विचारे, मनसेचे अविनाश जाधव यांच्यामध्ये झालेली लढत पाहता या मतदार संघात निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर कोपरी पाचपाखाडी मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी लढवत होते, यांच्या विरोधात शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाचे केदार दिघे होते. या मतदारसंघात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५५.७७ % मतदान झाले तर जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण परिसरात सायंकाळपर्यंत ६१.९३ टक्के मतदान झाले, यामुळे विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानाला प्रतिसाद दिला. मतदान करताना पोलिंग बूथ इथे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची तसेच भांडणाचे प्रकार देखील झाले परंतु बाकी विधानसभा क्षेत्रात शांततेत मतदान पार पडले यामध्ये भिवंडी ग्रामीण मतदारसंघात ६१.९३% मतदान झाले, शहापूर विधानसभा क्षेत्रात ५९.१२ टक्के मतदान पार पडले. भिवंडी पश्चिम ४६.१ , भिवंडी पूर्व ४५.६ टक्के मतदान झाले. कल्याण पश्चिम मतदार संघात ४१ टक्के, मुरबाड ५१.१६, अंबरनाथ ४३.७८, उल्हासनगर ४३.४, कल्याण पूर्व ५२.५३ डोंबिवली ५१.६८ कल्याण ग्रामीण ५१.६४ टक्के मतदान पार पडले. मीरा-भाईंदर ४८.३६, ओवळा माजिवडा ४६.३९, कोपरी- पाचपाखडी ५५.७७, ठाणे शहर ५२.४१, मुंब्रा -कळवा ४७.५२, एरोली मतदार संघात ५०.८८ टक्के मतदान झाले तर बेलापूर मतदार संघात ५१.४१ टक्के मतदान झाले.
ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यंदा मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याने ३ वाजेपर्यंत सरासरी ४० टक्के मतदान झाले. तर ५ वाजेपर्यंत सरासरी ५२ टक्के मतदान झाले. सायंकाळी शेवटच्या तासात मतदार राजा आणि महिलावर्गाला मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी राजकीय पक्षांचा आटापिटा सुरू होता. अशातच विधानसभा निवडणुकीचे मतदान अखेर मोठ्या उत्साहात झाले, कुठे पैसे वाटण्याचे प्रकार झाले तर कुठे भांडणाचे प्रकार झाले.मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क या मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वैद्यकीय पथके उपस्थित होती. तसेच पिण्याचे पाणी, आसनव्यवस्था उपलब्ध करून दिली गेली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. मतदारांमध्ये उत्साह असला तरीही मतदार याद्यांतील घोळ कायम होता. मतदारांची नावेच यादीतून गायब झाल्याचे, तर काहींना घराजवळील केंद्राऐवजी दूरच्या केंद्रावर मतदानासाठी जावे लागल्याच्या तक्रारी ठाण्यात पुढे आल्या आहेत. ठाणे आणि नवी मुंबई शहरातील मतदारसंघांमध्ये मतदार यादीतील जुन्या छायाचित्रांवरून ओळख पटत नसल्यामुळे मतदार आणि केंद्र अधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवल्याचे चित्र दिसून आले. ठाणे शहर मतदारसंघातील मनोरमानगर भागात भाजपच्या कार्यालयात मतदान केंद्राची माहिती मिळविण्यासाठी आलेल्या नागरिकांना भाजपला मतदान करण्यास प्रभावित केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यांनी भाजप कार्यालयात शिरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. तर अशाप्रकारे, विधानसभा निवडणुकीचे मतदान आता पार पडले असून सर्वांनाच २३ नोव्हेंबर म्हणजेच निकालाच्या दिवसाची उत्कंठा लागली आहे.
हे ही वाचा: