महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. त्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, जर पक्षाला निश्चित मते किंवा आमदार मिळाले नाहीत, तर त्याची मान्यता रद्द होऊ शकते. याबाबत माजी विधानसभा सचिव अनंत कळसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळालेली नाही. मागील निवडणुकीत एक आमदार निवडून आला होता, पण या निवडणुकीत मनसेला काहीही यश मिळालं नाही. त्यामुळे पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मनसेच्या एकही उमेदवाराने विजय मिळवला नाही, त्यामुळे त्याची मान्यता रद्द होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. यावर तज्ज्ञांची प्रतिक्रिया आली आहे. अनंत कळसे यांनी पक्षाची मान्यता राहण्यासाठी काय निकष आहेत याची माहिती दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी काही निकष असतात. 1 आमदार किंवा एकूण मतदानांच्या 8 टक्के मतं मिळाली तर त्याची मान्यता कायम राहते. 2 आमदार किंवा एकूण मतदानाच्या 6 टक्के मतं, 3 आमदार किंवा 3 टक्के मतं मिळाली पाहिजे. याप्रमाणे निकष पूर्ण झाल्यास पक्षाची मान्यता कायम राहते. अन्यथा मान्यता रद्द केली जाऊ शकते असे अनंत कळसे यांनी सांगितले.
निवडणुकीत मनसेला केवळ 1.8 टक्के मते मिळाल्याने, पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर अनंत कळसे यांनी उत्तर दिलं की, निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था आहे. ते आपला निर्णय घेऊ शकतात. आयोग पक्षांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकतो.
मनसेची मान्यता रद्द झाल्यास काय होईल?
मनसेची मान्यता रद्द झाल्यास त्यांना रेल्वे इंजिन असं चिन्ह मिळणार नाही. निवडणुकीतील मान्यता रद्द झाल्यानंतर जे चिन्ह उपलब्ध असते ते त्यांना मिळवावं लागेल. कायद्याने, त्या चिन्हावर त्यांचा दावा असू शकत नाही. मात्र, पक्षाच्या नावावर कोणताही प्रभाव पडणार नाही, असं अनंत कळसे यांनी स्पष्ट केलं.
महायुतीचा विजय, पुढे काय?
अनंत कळसे यांनी महायुतीच्या विजयावरही प्रतिक्रिया दिली. 14 वी विधानसभा 26 तारखेला स्पष्ट होईल. 15 व्या विधानसभेचे निकाल लागले आहेत. आज विधानसभेसाठी नवीन नोटिफिकेशन येऊ शकतं. 26 नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतात. एकनाथ शिंदे एकटे शपथ घेतल्यास त्यांना चालेल. राज्यपाल काळजीवाहू मुख्यमंत्री नियुक्त करू शकतात आणि ते काम करू शकतात. महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे, त्यामुळे महायुती सरकार स्थापनेचा दावा करणार आहे, असं अनंत कळसे यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”