राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे . मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची जोरदार धामधूम ही सुरू आहे. काल प्रचार संपला आहे. उद्या मतदान होणार आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. एकीकडे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी या समोर येत आहेत . मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ज्या राज्यात लाडकी बहीण योजना ही जोरदार सुरु आहे त्या राज्यात मात्र महिला उमेदवारांची संख्या कमी आहे. महायुती आणि मविआकडून किती महिला उमेदवारांना संधी मिळाली याबाबतच जाणून घेऊया.
आपल्या राज्यात लाडकी बहीण योजनेसारख्या असंख्य योजना सरकारने आणल्या आहेत. म्हणजेच महिला केंद्रीत निवडणुका होत असल्या तरीही राज्यातून महिला उमेदवारांना संधी देण्यास पक्षांकडून आजही हात आखडता घेतला जात आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात १००० पुरुषांमागे ९२९ महिला मतदार आहेत. तर, २०१९ मध्ये हा रेशो ९२५ पर्यंत घसरला. तसंच, २०२४ मध्ये १००० पुरुष मतदारांमागे ९३६ महिला मतदार आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. तर, ५ कोटी २२ लाख ७३९ पुरुष मतदार आहेत.
महायुती सरकारमध्ये महिलांना मंत्रिमंडळात फारसे प्रतिनिधित्व दिले गेले नाही. शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या एकमेव महिला मंत्री होत्या. त्यामुळे भारतीय निवडणूक आयोगाकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, सध्याच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण ४ हजार १३६ उमेदवार उभे आहेत. यापैकी जवळपास २५० महिला उमेदवार असून महायुती आणि महाविकास आघाडीने प्रत्येकी ३० महिला उमेदवारांना संधी दिली आहे. महाराष्ट्राच्या ६७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार झाल्या आहेत. तर यंदा २०२४ च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत २५० हून अधिक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ४ हजार १३६ उमेदवार निवडणूक लढवणार असून त्यापैकी फक्त सहा ते सात टक्के महिला उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडीचे महिला उमेदवार – प्रत्येकी ३०
महायुती – ३० महिला उमेदवार
भाजपा -१ ८
शिवसेना (एकनाथ शिंदे) – ८
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ४
महाविकास आघाडी – ३० महिला उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ११
शिवसेना (उद्धव ठाकरे) – १०
काँग्रेस -९
तसेच काही महत्त्वाच्या महिला उमेदवारांची नाव देखील सध्या चांगलीच चर्चेत आहेत. यामध्ये यामिनी जाधव, ऋतुजा लटके, मनीषा चौधरी, मनीषा वायकर, सुवर्णा कारंजे, शायना एनसी, विद्या ठाकूर, भारती लव्हेकर या काही महिला उमेदवार सध्या चर्चेत आहेत त्यामुळे महिला उमेदवारांमधून नेमका कोण गुलाल उधळणार हे चित्र येत्या २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.
हे ही वाचा:
लोकांसाठी आमचे दरवाजे नेहमीच खुले, आम्ही काम करतो म्हणून ते…| Avinash Jadhav | MNS | Thane