बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ईडीनं (ED) समन्स बजावलं आहे. ६ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश ईडीनं रणबीर कपूरला दिला आहे. ‘महादेव बुक’ ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणी रणबीर कपूरला अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं आहे. रणबीर कपूर हा अॅपचे प्रमोशन करत होता आणि रणबीरला यासाठी मोठ्या प्रमाणात रोख मिळाली आहे, असा दावा ईडीनं केला आहे.
या प्रकरणात केवळ रणबीर कपूरचे नाव येत नाही, तर या यादीत आणखी १५-२० सेलिब्रिटी आहेत जे ईडीच्या रडारवर आहेत. आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, नेगा कक्कर, भारती सिंग, एली अवराम, सनी लिओन, भाग्यश्री, पलकित सम्राट, कीर्ती खरबंदा, नुसरत भरुचा आणि कृष्णा अभिषेक यांची नावे या यादीत आहेत. ‘महादेव बुक’ ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूरचे नाव पुढे आले आहे. या ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नाला रणबीरने हजेरी लावली होती, असंही म्हटलं जात आहे. सौरभवर स्टार्सना पैसे दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रणबीर कपूरच्या आधी १४ बॉलिवूड स्टार्सची नावे समोर आली होची. या यादीत सनी लिओनीपासून नेहा कक्करपर्यंतच्या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.
रिपोर्ट्सनुसार, फेब्रुवारीमध्ये महादेव बुक अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. सौरभचे लग्न दुबईत अतिशय थाटामाटात पार पडले. या लग्नात २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते, असं म्हटलं जात आहे. लग्नात अनेक स्टार्सनी परफॉर्म देखील केलं होतं. महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गेल्या काही दिवसांत मुंबईसह (Mumbai) राज्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. त्या दरम्यान १४ बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर आले. महादेव अॅपच्या संस्थापकाचे आणखी ४ ते 5५ असेच अॅप आहेत. या अॅप्सचे कॉल सेंटर श्रीलंका, नेपाळ, यूएई येथे आहेत. ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 100 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवरही बेकायदेशीर महादेव अॅपचा प्रचार केल्याचा आणि त्याचा मोबदला म्हणून, मोठी रोख रक्कम स्वीकारल्याचा संशय आहे.