Wednesday, November 29, 2023

Latest Posts

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांची घोषणा;गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली  आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी ही घोषणा केली.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली  आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी ही घोषणा केली. रोख पाच लाख रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरम्यान २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार आदी सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत दरवर्षी देण्यात येतात. यंदा पुरस्कारांच्या क्षेत्रांमध्येही विस्तार करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार २०२२ साठी पं. उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले आहे, २०२३ च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांत (नाना)श्रीधर मुळय़े यांची निवड करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पीत करणाऱ्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.  नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे, तर २०२३ साठी अशोक समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे. मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२२ चा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांना जाहीर झाला असून, २०२३ च्या पुरस्कारासाठी पं. मकरंद कुंडले यांची निवड झाली आहे. संगीत रंगभूमीसाठी विशेष योगदान देणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०२२ व २३ ची घोषणा केली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारीमध्ये दोन वर्षांचे अनुक्रमे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत युवक कलाकारांसाठी विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात यावी, अशी अनेक संघटनांची जुनी मागणी होती. या मागणीचा विचार करून राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील संग्रहालय वगळता इतर सर्व २३ क्षेत्रांमध्ये युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित करण्यात येणार आहेत. युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी वयाची मर्यादा २५ ते ५० एवढी राहणार असून, या पुरस्कारांची रक्कम एक लाख एवढी असेल.मुनगंटीवार यांनी विविध पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.पुरस्कारांची रक्कम पाच लाख रुपये होती. ती यंदा दहा लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम एक लाख रुपयांवरून तीन लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

Narak Chaturdashi ला नरकासुराचा वध का करतात? जाणून घ्या…

मुकेश अंबानींच्या कंपनीला २० हजार कोटींची दिवाळी भेट!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss