Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील दिग्गज नेते पायाला भिंगरी लावल्यासारखे प्रचारात फिरत आहेत. निवडणुकीचे डावपेच आखून अमलात आणत आहेत. त्याचवेळी दरदिवशी शेकडो लोकांना भेटताहेत आणि हे सगळे करूनही पुन्हा ताजेतवाने होऊन पुढे जात आहेत. एवढा स्टॅमिना ते आणतात तरी कुठून? त्यांच्या निकटवर्तीयांनी याचे रहस्य सांगितले.
सगळ्यांना अप्रूप वाटते ते नेते शरद पवार यांच्या एनर्जीचे वयाच्या ८४ व्या वर्षी ते तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने फिरतात. साध्य रोगावर त्यांनी मात केल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. आजचे सगळे दिग्गज नेते साठीच्या घरात असताना साठ वर्षांचा अनुभव असलेले शरद पवार यांचा नित्यक्रम म्हणजे ते सकाळी ६ ला उठतात, सकाळची तयारी आणि वृत्तपत्रांचे वाचन करून सकाळी ८ ला लोकांच्या गाठीभेटी सुरू करतात. ब्रेकफास्ट, जेवणात मऊ, चावायला त्रास होणार नाही असे पदार्थ प्रामुख्याने असतात. रात्री ११ च्या सुमारास ते झोपतात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीच्या तक्रारी अलीकडे वाढल्या असल्या तरी वेळापत्रकाचा आणि त्यांचा काही संबंध नसतो. त्यांना गर्दीत राहणे आवडते. सकाळी ब्रेकफास्टमध्ये उपमा, इडली असे साधे पदार्थ असतात पण फ्रूट ज्यूस आवर्जून घेतात असतात. जेवणाची वेळ कधीही ठरलेली नसते. गोड पदार्थ खाणे टाळतात. अभावानेच प्रचारात सोबत टिफिन असतो, प्रचाराला गेले की तिथल्या नेत्याकडे जेवतात. रात्री तीन-चार वाजता झोपतात. सकाळी ९ ला त्यांचा दिवस पुन्हा सुरू होतो.
उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रकृतीच्या मर्यादा असल्या तरी त्या झुगारून ते फिरत आहेत. अर्थातच जेवणात मर्यादा आल्या आहेत. उकडलेल्या वा कमी तेलाच्या भाज्या असे साधे जेवतात. मांसाहार पूर्वीसारखा नाहीच. शक्यतो जेवणाचा टिफिन सोबत असतो किंवा प्रचाराच्या शहरात कोणाकडे जेवायचे असेल तर जेवणात काय, काय लागेल ते आधी सांगितले जाते. त्यांच्या दौऱ्याच्या प्रत्येक नियोजनाची काळजी रश्मी ठाकरे घेतात.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री दोन अडीचला झोपतात. सकाळी साडेसहा सातला उठतात, ८ ला तयार होऊन बाहेर पडतात. व्यायाम करणे या काळात तरी शक्य होत नाही. सकाळी ११ ला नाश्ता करतात. दुपारी, सायंकाळी कॉफी घेतात आणि रात्री एकदाच जेवतात. प्रचारात ज्या ठिकाणी रात्री असतील तिथे एखाद्या स्थानिक नेत्याच्या घरी जेवण करतात. गेले वर्षभर जेवणात ते भाकरीच खातात. भाजी कोणतीही चालते.
उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री दोन-तीनला झोपतात. सकाळी ६ ला उठतात. भरपेट नाश्ता न करता ज्यूस पितात, मिळेल तिथे व मिळेल त्या वेळेत जेवतात पण आहारावर त्यांचे नियंत्रण असते. रात्रीही खूप कमी जेवतात.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, धानपट्ट्यातले आहेत. त्यांच्या जेवणात भात आवर्जून असतो. तेलकट खाण्याचे टाळतात. सकाळी जुजबी व्यायाम करतात. जेवढे बिझी राहाल तेवढे तंदुरुस्त राहाल, हे त्यांच्या स्टॅमिन्याचे रहस्य आहे.
यशस्वी व्हायचे तर शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सकाळी लवकर उठावे लागते, असा चिमटा काढला होता. पण राज ठाकरे सध्या सकाळी साडे सहाला उठतात, व्यायाम करतात. ते नऊपासून उमेदवार, पदाधिकारी यांच्या बैठका घेतात, नंतर उमेदवारांना गरजेनुसार कॉल करतात. अमूकच जेवण पाहिजे असे काही नसते, दिवसभरात बरेचदा ब्लॅक कॉफी घेतात.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड प्रकाश आंबेडकर यांची अलीकडे एंजिओप्लास्टी झाली, त्यामुळे अर्थातच आहारावर बरीच बंधने आली आहेत. त्यांनी प्रचाराचे तंत्र बदलले आहे, ते व्हिडिओद्वारे संवाद साधत आहेत.
हे ही वाचा:
PM Narendra Modi LIVE: धुळ्यातून पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल