महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचारमाध्यमांतून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि खोचक टोलाबाजीही पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मनसे आणि वंचित बहुजन आघाडी व इतर अपक्षांमुळे अनेक मतदारसंघामध्ये निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई यांनी टाईम महाराष्ट्र या डिजिटल न्यूज पोर्टलचे संपादक राजेश कोचरेकर यांनी घेतलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत अनेक राजकीय घडामोडींचा खुलासा केला आहे.
अमेरिकेत शिक्षण घेतलेले असताना त्यासाठी लागणारे पैसे, स्वतःची मेहनत आणि आई वडिलांची मेहनत ही वांद्रे पूर्व मतदारसंघातून युवा सेना नेता ते आमदारकीचा प्रवास करताना, सर्व मेहनत वाया गेली का? असा प्रश्न विचारला असता वरुण सरदेसाई यांनी उत्तर दिले की, २०१० साली मी इंजिनिअरिंग कॉलेजला होतो तेव्हापासून युवा सेना नेता म्हणून कार्यरत होतो. कॉलेज करता करता मी युवा सेनेचे आंदोलन केले आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवताना मी यशस्वी होत गेलो. त्यानंतर मला युवा सेनेचे कल्याण संपर्क प्रमुख हे पद मिळाले आणि त्यानंतर मला अनेक पदांचा कार्यभार देण्यात आला आणि तिथूनच माझी स्टेप बाय स्टेप प्रगती होत गेली. माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला लोकसभेची निवडणूक झाली आणि लगेच तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होती. विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती पण कोलंबिया युनिव्हर्सिटीतून पुढील शिक्षण घेण्यासाठी घरच्यांनी आणि पक्षातील सर्वांनी आग्रह केला. माझे पुढील शिक्षण मी अमेरिकेत घेतल्यावर परत आलो आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत, मुंबई महानगरपालिकेत काम केलं आणि नंतर युवा सेनेचे सचिव हे पद मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने ग्लॅमरस आले. त्यामुळे मेहनत वाया गेली असे सांगता येणार नाही .
कोणाच्याही अध्यात ना मध्यात असणारे निरागस असे तुमचे आईवडील हे तुम्ही शिवसेनेसारख्या राकट, रागंड्या, आंदोलनं करून रस्त्यावर उतरणे या गोष्टीला सुरुवातीला तुम्हाला विरोध केला असेल, पण आता काय परिस्थिती आहे? असा प्रश्न वरूण सरदेसाई यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, माझ्या आईवडिलांचा राजकारणाशी दूरदूर संबंध नाही. पण मी लहानपणापासून दसरा मेळावा आणि कुठेही शिवसेनेची सभा असली तर मी आवर्जून जायचो म्हणून मला ती आवड निर्माण झाली. कॉलेजला असताना अनेक आंदोलने व्हायची. आंदोलनामध्ये ऍक्शनला रिऍक्शन ही होतेच. तेव्हा कुठेतरी घरच्यांचा विरोध असायचा. गेली ५ वर्षे मी २४ x ७ राजकारणात आहे, त्यामुळे मला राजकारणाची आवड निर्माण झाली. मी जे काही काम करतोय ते प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पूर्ण करतोय या कारणामुळे आई वडिलांनी मला विरोध कधी केला नाही.
स्टुडंट विंग ऑपरेट करणं आणि स्टुडंट विंगच्या निवडणूक जिंकून आणणं याचा एक स्पेशालिस्ट म्हणून वरुण सरदेसाई काम करतायेत. इथे शिवसेना कमी पडतेय आणि तिथे आपण जायला हवं, असे वरून सरदेसाई यांना कधी वाटले? भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी मोहन रावलेंनंतर थेट राज ठाकरेंकडे आली. नंतर आदित्य ठाकरे आले, पण आदित्य ठाकरे पटकन नेता, मंत्री झाले व सरकारमध्ये गेले आणि जी पोकळी राहिली ती वरुण सरदेसाई यांनी भरून काढली. हा जो स्टुडंट विंगचा फाईन ट्युनिंग आहे तो कॅपिटल करायला पाहिजे हे वरुण सरदेसाई यांना कधी वाटले ? असा प्रश्न वरुण सरदेसाई यांना विचारल्यावर ते म्हणाले की, युवा सेनेची स्थापना झाल्यावर जी सिनेटची निवडणूक झाली ती १०० टक्के आदित्य ठाकरेंनी ओव्हरसी केली. १० पैकी ८ सीट आम्ही जिंकलो आणि तेव्हा आमच्या पक्षात सर्वांना कॉन्फिडन्स आला. गेल्या २ वर्षांपूर्वी जेव्हा आमचा पक्ष फुटला तेव्हा आम्ही ठरवले की मुंबई विद्यापीठापुरते सीमित न राहता नागपूर, गडचिरोली, अमरावती, पुणे अशा अनेक ठिकाणी सिनेटचा उमेदवार उभा करून त्याला जिंकून आणायचे. प्रत्येक विद्यापीठात युवा सेनेचा उमेदवार असावा यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले. तेव्हा खऱ्या अर्थाने स्टुडंट विंगचा फाईन ट्युनिंग आहे तो कॅपिटल करायला पाहिजे असे वाटले .
सिनेटच्या निवडणुकीचा न्यायालयीन तंटा सुरु होताना नायायालयात जायचा निर्णय आहे तो रात्री उशिरा झाला आणि तो आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि वरुण सरदेसाई या त्रयीमध्येच मर्यादित ठेवला गेला. शिवसेना अजूनही लिकेज आहे म्हणून तो निर्णय गोपनीय ठेवला गेला का? तो रणनीतीचा एक भाग होता का? अशी वरुण सरदेसाई यांना विचारणा केली असता त्यावर त्यांनी उत्तर दिले की, राज्यसरकारला निवडणूक नको होत्या. त्यांना भीती होती की, दहा पैकी एकही जागा त्यांची येणार नाही. गेल्यावेळी आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेऊन ती निवडणूक रद्द केली होती. यावेळीपण त्यांची अधिकृत अ. भा. वि. प. त्यांनी कोर्टात जाऊन तो प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. रविवारी मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटच्या निवडणूक होत्या आणि शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता तात्काळ मिटिंग बोलावली आणि ती मिटिंग रात्री ९.३० पर्यंत चालवली. रात्री ९.३० ला निवडणूक रद्द करण्याचा आदेश आला. तेव्हापासून शनिवारी विकेंड बेंच असल्यामुळे आम्हाला तेवढाच वेळ होता. त्यामुळे लीकेजपेक्षा कोणाला सांगायला वेळच नव्हता. त्यामुळे तो रणनीतीचा भाग होता हे चुकीचे आहे.
वरुण सरदेसाई सुरुवातीला डोंबिवलीला राहायचे तर तिथून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वरुण सरदेसाई निवडणूक जिंकणार असे सर्वांना वाटत असताना एकनाथ शिंदेनी विरोध केला असं सांगितलं जातं, तर हे कितपत खरं आहे? यावर वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया होती की, माझा जन्म डोंबिवलीचा आहे. मी वयाच्या १८ व्या वर्षी मुंबईला राहायला आलो. मुंबईला राहत असताना डोंबिवलीतून निवडणूक लढवणे शक्य नव्हते. अर्थात मी पॉलिटिकली त्या भागात ऍक्टिव्ह होतो. निवडणूक लढवण्यापेक्षा मला स्वतःला संघटनेत काम करायला जास्त आवडतं. त्यामुळे इलेक्ट्रॉल पॉलिटिक्सचा मी गांभीर्याने कधी विचार नाही केला. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपबरोबर जेव्हा युती होती तेव्हा डोंबिवलीची जागा ही वारंवार भाजपकडे होती आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे होते त्यामुळे मी कधी गांभीर्याने या गोष्टींकडे पाहिले नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मला वांद्रेमधून निवडणूक लढवण्यासाठी सक्रिय होण्यासाठी सांगितले. मी माझ्या कामात पूर्णपणे प्रामाणिकपणा दाखवला असे मला वाटते.
मागच्या विधानपरिषदेच्या वेळी अनिल परब यांना तिकीट मिळाले तेव्हा तुम्ही नाराज झालात. अनिल परब यांची विधानपरिषद असू द्या किंवा मिलिंद नार्वेकर यांना मिळालेली संधी असू द्या, या दोघांच्या प्रक्रियेमध्ये रांगडा शिवसैनिक हा कधी जात नाही, तेव्हा तुम्ही ज्या मार्गावर चाललेत त्यामुळे किती निराशा आली? यावर वरून सरदेसाई यांनी सांगितले की, मी इंजिनिअर असल्यामुळे मला आकड्यांची प्रचंड आवड आहे. जेव्हा जेव्हा निवडणूक येतात तेव्हा जिथे गणितं बसवायची आहेत तेव्हा मी स्वतः जबाबदारी मागून घेतो. अनिल परब, सुभाष देसाई हे गेली अनेक वर्षे यात पुढाकार घेतायेत आणि यांच्यासोबत बसूनच मी या गोष्टी शिकलो. पदवीधरांची निवडणुकीमध्ये मला जास्त पुढाकार घेता आला कारण मी सिनेटचे काम केले. मी अनिल परब यांना मला काऊंटिंग एजन्ट बनवा असेही सांगितले कारण मला या सर्व गोष्टी शिकायच्या होत्या. यंत्रणा कशी राबवली जाते आपण यामध्ये काहीतरी नवीन करू शकतो का याची मला आवड आहे त्यामुळे नाराज होण्याची गोष्टच नाही.
आईच्या मायेने जर आपल्याला कोण सांभाळत असेल तर त्या नात्याचं नाव आहे मावशी. रश्मी ठाकरे या तुमच्या मावशी आहेत. जर रश्मी ठाकरे यांच्यासोबत तुमचे नातेसंबंध नसते आणि पक्षफुटीनंतर केडर हे मातोश्रीसोबत राहिले हे आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. सत्ता, पैसा, प्रशासन हे त्याच्या ठिकाणी आहे, पण केडर हे कोणाला निर्माण करता येत नाही. पण त्या केडरमधल्या गर्दीमध्येसुद्धा वरुण सरदेसाई नावाचा मुलगा जे काही मिळवू शकला ते रश्मी ठाकरे यांच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे मिळवू शकला असे आम्हाला वाटतंय. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांपैकी वरुण सरदेसाई यांना भरभरून प्रेम कोणी दिले? यावर ते म्हणाले, हे सांगणं मला अशक्य आहे. कारण रश्मी ठाकरे यांचे मावशी म्हणून मला पूर्ण समर्थन असतंच. पण राजकीय निर्णय असतात ते पक्षाच्या लेव्हलवर घेतले जातात. मला युवा सेनेचा प्लॅटफॉर्म आदित्य ठाकरेनी उपलब्ध करून दिला. पहिल्या आंदोलनापासून ते आताच्या निवडणुकीपर्यंतचे पॅम्प्लेट हे मला आदित्यने आखून दिले. उद्धव ठाकरे यांनी मला संधी दिल्याशिवाय मी या गोष्टी करूच शकलो नसतो. पण या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी केला.
आदित्य ठाकरेंना तुम्ही जवळून ओळखता तर त्यांच्याकडून काय शिकावं असे तुम्हाला वाटते? यावर वरुण सरदेसाई यांनी सांगितले, आदित्य ठाकरे यांच्याकडे भरपूर गुण आहेत. त्यांचे वाचन अप्रतिम आहेच तसेच इंग्लिश, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषांवर त्यांचे कमांड आहे. मला प्रचार करायच्या अगोदर मी त्यांची भाषणं ऐकून जातो. त्यांच्या १४ वर्षाच्या प्रवासात त्यांनी कधीच कोणावर वैयक्तिक आयुष्यावर टीका केली नाही. ते कधीच कोणावर लवकर रागवत नाही. त्यांची पॉलिटिकल पर्सनॅलिटी आहे त्यात त्यांना समजते की जर त्यांच्यावर कोणी टीका करत आले तर time will answer. सुरुवातीच्या काळात ते मंत्री झाले तेव्हा भाजपने त्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी अतिशय शांतपणे सर्व गोष्टी हाताळल्या. तसेच ते पत्रकार परिषदेत कोणत्याही पुराव्याशिवाय बोलत नाही. महापालिका, पर्यावरण यांसंबंधितचे विषयांचा त्यांचा अभ्यास आहे त्यातून मला खूप काही शिकण्यासारखे आहे.
आदित्य ठाकरेंनी पक्ष फुटल्यानंतर एक लाईन दिली ती म्हणजे चाळीस खोके एकदम ओके.ही लाईन ज्या वेगाने पसरली त्यानंतर तुम्ही जेव्हा केडर मध्ये जाता त्यावेळेला शिवसेना पुन्हा एकदा या गोष्टीतून सावरेल असे तुम्हाला वाटते का ? यावर वरून सरदेसाई म्हणाले, आदित्य ठाकरेंनी १५० मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या. जिथे भाजपचे लोक आमदार होते तिथेपण जाऊन त्यांनी सभा घेतल्या. त्यामुळे आम्ही नेहमी फ्रंटफूटवर खेळत राहिलो. एका लोकसभेत त्यांनी आठ ते दहा सभा घेतल्या. पक्षफुटीनंतर अवघ्या सहा महिन्यात आम्ही नवीन संघटन उभे केले. युवा सेना अध्यक्ष आणि शिवसेना नेता म्हणून आदित्य ठाकरेंनी सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या.