गणपती बाप्पाचे स्मरण करून कोणत्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे. गणपती ही विद्येची आणि बुद्धीची देवता आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना गणपतीची अनेक रूपे ही भुरळ घालतात. संपूर्ण भारतात अशा विविध रूपांतील गणेश मूर्ती ही पाहायला मिळतात. इतकेच नाही तर, भारताबाहेर अनेक देशांमध्येही गणपतीची अनेक मंदिरे आहेत. मात्र महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरामागे खूप मोठा इतिहास आहे. गणरायाचा सर्वांत मोठा उत्सव आता सुरू होत आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या या गणपतीच्या आठ मंदिरांच्या स्थापनेच्या विविध आख्यायिका आहेत. आठही गणपती हे स्वयंभू आहेत. या अष्टविनायकांवर महाराष्ट्रातीलच नाही तर दूरदूरच्या अनेक भक्तांची खूप श्रद्धा आहे. तर मग अष्टविनायकातील ८ गणपतीचा इतिहास जाणून घेऊया.
मयुरेश्वर (मोरगाव)
मोरगावला असलेला मयूरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे. हे गणपतीचे स्वयंभू आद्यस्थान आहे. या ठिकाणी गणपतीने मोरावर बसून सिंधू राक्षसाचा वध केला होता, अशी आख्यायिका आहे. त्याच्यामुळेच याचं नाव मयूरेश्वर असे पडले. तिथे गजाननाची बसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे. या गणपतीला तीन डोळे असून डोळे व नाभीमध्ये हिरे बसवले आहेत. डावीकडे वळलेली ही सोड व डोक्यावर नागराजांचा फणा आहे. नेहमी भगवान शंकरांच्या मंदिराबाहेर असणारा नदी इथे मयूरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे, हे इथलं वैशिष्ट्य आहे. मंदिराला असलेले चार दरवाजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाची प्रतीके मानले जातात.
श्री सिध्दीविनायक (सिद्धटेक)
सिद्धिविनायकाचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक इथे आहे. हा अष्टविनायकातील दुसरा गणपती आहे. या गणपतीबाबत एक पौराणिक कथा आहे. मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांशी भगवान विष्णूच युद्ध सुरू होत. अनेक वर्षे हे युद्ध चालल. पण विष्णूंना यश मिळत नव्हते. तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचे स्मरण व प्रार्थना करायला सांगितले. त्यानंतर विष्णूंनी मधु व कैटभ राक्षसांना इथे ठार केल. म्हणूनच इथे विष्णूचं मंदिर ही पाहायला मिळते. सिद्धिविनायकाची ही मूर्ती ३ फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. हा उजव्या सोडेचा गणपती आहे.
श्री बल्लाळेश्वर (पाली)
रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वराच सुंदर मंदिर आहे. गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या गणेशाच नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं. भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आले होतं. तेव्हा गजाननाचे स्मरण केल्यामुळे बल्लाळाच्या भक्तीवर श्रीगणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथे दर्शन दिलं. पुढे अनेक वर्षं या ठिकाणी राहणार असल्याचे ही गणपतीने सांगितले. तर तोच हा पालीचा बल्लाळेश्वर.
श्री वरदविनायक (महड)
रायगड जिल्ह्यातील महड गावात अष्टविनायकातील चौथा गणपती आहे. हा वरदविनायक नवसाला पावणारा असल्याचे सांगितले जाते. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर रिद्धीसिद्धीच्या मूर्ती आहेत. त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते. मंदिराच्या चारही बाजूला चार हत्ती आहेत. मंदिराचा घुमट २५ फूट उंच असून त्यावर एक सोनेरी कळस आहे. मुख्य मंदिराच्या समोर सभामंडप आहे. मंदिराच्या जवळ देवाचे तळे आहे. उन्हाळ्याशिवाय इतर वेळी तळ्यात पाणी असते. मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून नवीन मंदिर खूप देखणे आणि सुंदर आहे.
श्री चिंतामणी (थेऊर)
पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचे मंदिर आहे. भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू असून, ती पूर्वाभिमुख आहे. डाव्या सोडेचा हा गणपती असून, त्याच्या डोळ्यांमध्ये सुंदर हिरे आहेत. मांडी घालून बसलेले गजाननाचे हे रूप डोळ्यांच पारणं फेडते. सर्व चिंता नष्ट करणारा हा चिंतामणी भक्तांना पावतो. माधवराव व रमाबाई पेशवे यांचे स्मरण येथे आल्यावर होते. रमाबाई पेशवे यांची समाधी येथे आहे.
श्री गिरिजात्मक (लेण्याद्री)
पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरीजात्मजाचे मंदिर आहे. डोंगरावर असलेले हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे. तसेच हे मंदिर बौद्धगुहेच्या ठिकाणी बांधण्यात आलय. गिरीजा हे देवी पार्वतीचे नाव असून, तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचे मंदिर इथे आहे. एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेले आहे. मंदिराला जवळपास ३०० पायऱ्या आहेत. या डोंगरात १८ बौद्धगुहा आहेत. त्यापैकी आठव्या गुहेत गिरीजात्मजाचे मंदिर आहे.
श्री विघ्रेश्वर (ओझर)
अष्टविनायकातील हा सातवा गणपती आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावात आहे. श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर बसवलेले आहे. या ठिकाणी गणपतीने विघ्नासुर नावाच्या असुराचा वध केला होता. तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर असे नाव पडले, अशी एक आख्यायिका आहे. गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या विघ्नहर मंदिरात गणेशोत्सव काळात चार दिवस द्वार यात्रा आणि पालखी उत्सव ही सुरू असतो.
श्री महागणपती (रांजणगाव)
पुणे जिल्ह्यातील रांजणगावात श्री महागणपतीचे मंदिर आहे. गणेशाचे सर्वांत शक्तिशाली आणि प्रभावशाली महागणपतीचे रूप इथे आहे. कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथे रिद्धी व सिद्धीदेखील आहेत. गजाननाच्या या रूपाला महोत्कट असे ही म्हटले जाते. या गणपतीला १० सोडी व २० हात आहेत. या गणपतीला पेढ्याचा नैवेद्य अर्पण करण्याची ही प्रथा आहे.
हे ही वाचा:
यंदा गणेशोत्सवनिम्मित भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिरांना द्या नक्की भेट
रात्री झोप येत नाही? मग ‘हे’ उपाय एकदा तरी नक्की करून बघा…