नवत्ररोत्सव आणि दसऱ्यानंतर दिवाळीची प्रतिक्षा सगळेच करत असतात.आता दिवाळीची तयारीही सगळीकडे सुरू झाली आहे. फराळ, सजावट अन् खरेदीमुळे दिवाळीच्या उत्साहाला आनंदाची भरती आलेली आहे. दिवाळी सण साजरा करण्यामागे प्रत्येकाच्या काही ना काही प्रथा, मान्यता व परंपरा आहेत. दिवाळीला प्रत्येकजण आपल्या घरात फराळ बनवतो पण त्यांची पद्धत, पदार्थ सारे वेगवेगळे असतात. दिवाळीत घरोघरी, मंदिरात दिवे लावून, सजावट करून माता लक्ष्मीची पूजा आणि आराधना यादरम्यान केली जाते. दिवाळी हा हिंदू धार्मियांचा सर्वात मोठा सण असून, सगळ्याच हिंदू घरात दिवाळी साजरी केली जाते. पण, देशात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे जाती-धर्मापलिकडे दिवाळी साजरी केली जाते.
राजस्थानमधील झुंझुनू या ठिकाणी असलेल्या दर्ग्यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील लोक एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात,दर्गा कमरुद्दीन शाह असं या दर्ग्याचे नाव आहे. भारतात अनेक ठिकाणी दिवाळीनिमित्त आपल्याला हिंदू मुस्लिम ऐक्य पहायला मिळतं. राजस्थानात होणारी दिवाळीही त्याचेच एक प्रतिक आहे. दिवाळीच्या दिवशी हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोक एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात, या दिवशी या दर्ग्यात दिवे लावले जातात व फटाके फोडून आणि मिठाई देऊन दिवाळीचा आनंद साजरा करतात.
कमरुद्दीन शाह दर्ग्यात एकत्र येऊन दिवाळी साजरी करण्याची ही परंपरा सुमारे २५० वर्षांपासून अबाधित सुरू आहे. दर्ग्याचे सर्व कामकाज पाहणारे एजाज नबी सांगतात की, एके काळी सुफी संत कमरुद्दीन हे चचलनाथ टीलेचे संत चंचलनाथ जी यांचे चांगले मित्र होते.दोघेही एकमेकांना भेटले तर एक दर्ग्यातून तर दुसरे संत आश्रमातून बाहेर पडायचे. दोघेही वाटेतल्या बाजारात भेटायचे.दोघेही कोणत्याही कार्यक्रमांना एकत्र येत असत.त्यामुळे या परंपरेनुसार आता दिवाळी केवळ दर्ग्यातच साजरी केली जात नाही, तर चंचलनाथ टिळा येथेही दिवाळी साजरी केली जाते, ही परंपरा आजही कायम आहे.
हे ही वाचा :
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील ‘भुवनेश्वरी’,म्हणजेच कविता मेढेकर ठरल्या सर्वोत्कृष्ट खलनायिका
दिवाळीसाठी बनवा चटपटीत चिवड्याची सोपी रेसिपी