तब्बल १२ वर्षानंतर होणाऱ्या कुंभमेळाव्यासाठी विशेष गाड्यांची सुविधा पुणेकरांसाठी इंडियन रेल्वे ने करण्यात आली आहे. येत्या १३ जानेवारी २०२५ पासून कुंभमेळ्याला सुरुवात होत आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम म्हणून याकडं पहिले जाते. यामध्ये देश-विदेशातून लाखो लोक सहभागी होत असतात. कुंभमेळावा हा १२ वर्षांनी हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज या ४ ठिकाणी भरतो. यावेळी १२ जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू होत आहे.
भारतीय रेल्वे महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर अनेक विशेष गाड्या चालवण्यात येत आहे. IRCTC ने महाकुंभमेळाव्यासाठी ७ राज्यांतून विशेष गाड्या चालवण्याची घोषणाही केली आहे. दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा या राज्यांचा समावेश आहे. भारत गौरव ट्रेन म्हणून ह्या विशेष ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. दिनांक १५ जानेवारी ते २३ फेब्रुवारी दरम्यान या विशेष ट्रेन धावणार आहेत. पहिली गाडी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पुण्यातून प्रयागराजसाठी निघणार आहे. याशिवाय प्रयागराजला जाण्यासाठी नांदेड-पटणा-नांदेड, छत्रपती संभाजीनगर-पटणा-छत्रपती संभाजीनगर, काचीगुडा-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद या विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत.
केवळ भारतच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. कुंभमेळ्यात गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्याची सर्व पापे धुऊन मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. ही बाब लक्षात घेता महाकुंभ मेळाव्यासाठी त्याचप्रमांणे देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘देखो अपना देश’ कार्यक्रमाशीही हा उपक्रम जोडला गेला आहे. भारत गौरव ट्रेनमध्ये प्रवाशांना प्रवासासोबतच जेवण आणि राहण्याची सुविधाही मिळणार आहे.पुण्याहून प्रयागराजला जाणाऱ्या या भारत गौरव ट्रेनचे (स्लीपर) तिकीट २२,९४० रुपये आहे. तर ३AC तिकीट ३२,४४० रुपये आहे. तर, कम्फर्ट क्लास २AC तिकिटाची किंमत ४०,१३० रुपये आहे. या ट्रेनमध्ये एकूण १४ डबे आहेत, ज्यात अंदाजे ७५० प्रवासी बसू शकतात. पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, वाराणसी आणि अयोध्या यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांचा यामध्ये समावेश आहे.