मकर संक्रांतीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वपूर्ण मानले जाते.महाराष्ट्रात १४ जानेवारीला मकरसंक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या दिवशी तिळाचे लाडू बनवून एकमेकांना भेटून तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या जातात. मकरसंक्रांतीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत पतंग उडविले जातात. मकर संक्रांती हा दिवस सूर्यदेवाला समर्पित केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने शुभ व मांगलिक कार्यांची सुरुवात होते. तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात आहे. दरवर्षी हा सण १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हा सण विवाहित महिलांसाठी खूप खास मानला जातो, मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक राज्यांत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यंदाची मकर संक्रांत गुरुवार, १४ जानेवारी रोजी आहे. या दिवशी सूर्य सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल.
पंचांगानुसार, मकर संक्रांतीचा पुण्य काळ सकाळी ९ वाजून ०३ मिनिटांपासून ते सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहील. तसेच महापुण्य काळ सकाळी ९ वाजून ०३ मिनिटांपासून सुरु होईल तर १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत असेल.पौराणिक कथेनुसार विविध कथा सांगितल्या जातात. त्यातील एका कथेनुसार, शंकरासूर नावाच्या राक्षसाचा देवी संक्रांतीने वध केला होता, त्यामुळे या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. तसेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने राक्षस किंकरासुरचा वध केला होता, त्यामुळे या दिवसाला किंक्रात म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी भारतातील अनेक तीर्थस्थानांवर लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तसेच या दिवशी सूर्याला अर्ध्य देतात. या दिवशी सूर्याची उपासना केली जाते. संक्रांतीच्या दिवशी गरजू लोकांना काळे तीळ, चादर, गूळ, तूप या वस्तू दान करण्याचे महत्त्व आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे. हिवाळा हा असा ऋतू आहे, ज्या ऋतूमध्ये अनेकांना सर्दी-खोकलासारख्या आजाराचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी नव्या ऋतूच्या आगमनाच्या वेळी जंतू आणि जीवाणू नष्ट करण्यासाठी अनेक जण सूर्यप्रकाश घेतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यप्रकाश घेणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. ही सूर्यकिरणे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर असतात. हा उपक्रम अधिक उत्साही बनवण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी हळूहळू सूर्यप्रकाश घेताना पतंग उडवणे ही परंपरा अस्तित्वात आली.
हे ही वाचा:
राज्य सीईटी कक्षाचा मोठा निर्णय; CET परीक्षांच्या तारखांमध्ये बदल
कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष ट्रेन ची सुविधा !