दरवर्षी मोठ्या उत्साहात बैलपोळ्याच्या सण साजरा केला जातो. श्रावण अमावस्याच्या दिवशी बैलपोळा हा साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नागरापासून किंवा शेतीपासून आराम दिला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. महाराष्टात मोठ्या प्रमाणात बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो. फक्त महाराष्टात नाही तर महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या मध्यप्रदेश आणि तेलंगणा सीमा भागात ही हा सण साजरा केला जातो. या वर्षी १४ सप्टेंबर गुरुवारी बैलपोळ्याचा सण साजरा केला जाणार आहे. तर बैलपोळ्याच्या सण हा नेमका का साजरा केला जातो? शेतकऱ्याच्या दृष्टीने बैलपोळ्याचे काय महत्व आहे? याची माहिती आपण जाणुन घेऊया.
पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णाच्या रुपात या धर्तीवर अवतरले होते. तेव्हा कृष्णाचे मामा कंसाने कृष्णाचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो. भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे. आता कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्यासोबत दिवसरात्र शेतात राबणार्या बैलांचा एकमेव सण बैल पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो. ज्या व्यक्तीकडे शेती किंवा बैल नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. पोळा सणाच्या एक दिवस आधीच्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा किंवा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलपोळ्या सणाचे विशेष महत्व आहे. बैल हे वर्षभर शेतात खूप राबतात. शेतकऱ्यांना बैलांची साथ असते. म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र ही म्हटले जाते. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला होता. त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा एक सण आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा सणाच्या पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसर्या दिवशी लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवितात. याला तान्हा पोळा म्हणून ही साजरा केला जातो.
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. बैलाच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या, घुंगरांच्या माळा, नवी वेसण आणि नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो. शेतकरी स्वतः आपल्या बैलाचा शृंगार करतात. त्या दिवशी बैल सजवून त्याची मिरवणुन काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण हे बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्याना वाजंत्री, सनई, ढोल आणि ताशे वाजवत एकत्र आणले जातात. अनेक गावांमध्ये बैल पोळ्याला शर्यतींचे आयोजन ही करण्यात येते.
हे ही वाचा:
कृष्णजन्माष्टमीला करा या पाच गोष्टींचा वापर
झटपट होणाऱ्या पारंपरिक पाटवड्या