Narak Chaturdashi 2023, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी… प्रकाशाचा हा उत्सव प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. हिंदू पचांगानुसार कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा हा उत्साह पाच दिवसांचा असतो. प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीचा (Diwali 2023) सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात सुरु झाला आहे. आज नरक चतुर्दशीचा दिवस (Narak Chaturdashi). नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला ही तिथी ‘नरकचतुर्दशी’ म्हणून ओळखली जाईल, असे सांगितले. ह्या चतुर्दशीला ‘रुपचतुर्दशी’ असेही काही लोक म्हणतात.
नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि अवध्यत्वाचा – म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या आणि त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अशा एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले. आणि मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली आणि अशाच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले आणि वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व आणि मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.
ह्या दिवशी संध्याकाळी समईच्या चार वाती प्रज्वलित करुन पूर्वाभिमुख होऊन ती तेवती समयी दानात देण्याची प्रथा काही मंडळी आजही पाळतात. तसेच, कोकणात अंघोळ केल्यानंतर ‘कारेटं’ अंगठयाने फोडण्याची प्रथा आजही पाळली जाते. नरकासुराच्या वधाचे ते प्रतीक आहे असे मानतात. या नरक चतुर्दशीची प्रथा आणि शुभ मुहूर्त नेमका काय आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. नरक चतुर्दशीची कथा आपल्या सगळ्यांनाच साधारणपणे माहित आहे की, श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. आणि अनेक स्त्रियांची सुटका केली. म्हणून मांगलिक स्नान ज्याला आपण अभ्यंगस्नान म्हणतो. हे अभ्यंगस्नान १२ तारखेला पहाटे साडेपाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत या काळात करायचं आहे. अभ्यंग याचा अर्थ आपण इतर वेळी जे स्नान करतो त्याच्यापेक्षा अभ्यंगस्नान हे वेगळं आहे. अंगाला तेल लावणे, उटणे लावणे आणि नंतर कोमट पाण्याने डोक्यावरून स्नान करणे. अशा प्रकारे हे अभ्यंगस्नान नरक चतुर्दशीच्या दिवशी करायचं आहे. या दिवशी अभ्यंगस्नानालाच महत्त्व आहे.
हे ही वाचा :
ऐन सणासुदीत मुंब्र्याला आलं छावणीचं स्वरुप, ५०० पोलीस, एसआरपीएफ…
दिवाळीसाठी कंदील खरेदी करताना हेमांगी कवीची उडाली तारांबळ