मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी ‘भोगी’ हा सण साजरा केला जातो. भोगीनिमित्त महाराष्ट्रातील बहुतांश घरात तीळ लावून बाजरीची भाकरी आणि भोगीची भाकरी भाजी हमखास केली जाते. त्यामुळे येत्या १४ जानेवारीला भोगी असून या दिवशी तुम्ही देखील तुमच्या घरी भोगीची भाजी करणार असाल तर ही पारंपरिक पद्धत वापरून भोगीची भाजी नक्की तयार करा.
पारंपरिक भोगीची भाजी रेसिपी
साहित्य:
- हरभऱ्याचे दाणे – १ वाटी (रातभर भिजवलेले)
- शेंगदाणे – १ वाटी
- चवळीच्या शेंगा – १ वाटी (लहान तुकडे केलेल्या)
- गाजर – १ वाटी (लांबट तुकडे)
- सुरण – १ वाटी (सोलून मध्यम तुकडे केलेला)
- वांगी – १ वाटी (लांबट तुकडे)
- फुलकोबी – १ वाटी (छोट्या फुलांचे तुकडे)
- हिरवी मिरची -३ ते ४ (उभी चिरून)
- गूळ – २ चमचे
- चिंच – १ लहान लिंबाएवढी (पाण्यात भिजवून कोळ काढून)
- मीठ – चवीनुसार
- हळद – १ चमचा
- लाल तिखट – १ चमचा
- मोहरी – १ चमचा
- जिरे – १ चमचा
- तेल – २चमचे
- ओले खोबरे – २ ते ३ चमचे (किसलेले)
- कोथिंबीर – बारीक चिरलेली
कृती:
- सर्व भाज्या धुवून आणि कापून तयार ठेवा. हरभऱ्याचे दाणे रातभर पाण्यात भिजवून ठेवा.
- मोठ्या पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, आणि हिरव्या मिरच्या घाला. मोहरी तडतडली की हळद घाला.
- भिजवलेले हरभऱ्याचे दाणे, शेंगदाणे आणि चवळीच्या शेंगा घालून २-३ मिनिटे परता. नंतर बाकीच्या भाज्या (गाजर, सुरण, वांगी, फुलकोबी) घालून परता.
- गूळ, चिंच, लाल तिखट, आणि मीठ घालून सर्व व्यवस्थित मिसळा.
- आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेवून भाज्या मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा.
- भाज्या शिजल्यावर त्यात किसलेले ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- गरमागरम पारंपरिक भोगीची भाजी तयार आहे. ही भाजी तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट लागते.