दिवाळीला सुरुवात ही झाली आहे. दिवाळी चालू झाली की सर्वत्र रोषणाई असते. एक वेगळाच उत्साह आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो. दिवाळीत प्रत्येकाच्याच घरी दिवाळीचा फराळ हा बनवला जातो. लाडू, करंजी, चकली, शेव, चिवडा… असे सगळे पदार्थ हे बनवले जातात. दिवाळीत काही दिवस जेवण न करता फक्त लाडू अन् चिवड्यावर दिवस काढणारे चिवडा लव्हर्स देखील प्रत्येकाच्याच घरात असतात. चिवड्यासोबत लाडू हे समिकरण ऐकूणच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. तसेच दिवाळीत प्रत्येकाच्याच घरात वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे हे बनवले जातात. पण दिवाळीत मात्र पोह्यांचाच चिवडा हा आवर्जून केला जातो.
पोहे तळून अन् भाजके अशा दोन्ही प्रकारचा चिवडा तयार होतो अन् तो स्वादिष्टही असतो. पण, यंदाच्या दिवाळीला जरा पौष्टिक अन् लगेचच फस्त होईल अशी चव असलेला चिवडा बनवायचा असेल तर लाह्यांचा चिवडा तुम्ही बनवू शकता. या लाह्या मक्याच्या नाही तर, जोंधळ्याच्या आहेत. तुम्हाला या चिवड्यासाठी जोंधळ्याच्या लाह्या लागणार आहेत.
साहीत्य –
- ४ वाट्या जोंधळ्याच्या किंवा साळीच्या लाह्या
- १ वाटी दाणे
- अर्धी वाटी खोबऱ्याचे पातळ काप
- भरपूर कढीलिंब
- २ टेबलस्पून साजूक तूप
- अर्धा टी. स्पून काळे मीठ
- साधे मीठ, जिरे, मोहोरी, हळद,
- १०-१२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
कृती –
सर्वात आधी चिवडा करण्यापूर्वी जोंधळ्याच्या लाह्या नीट चाळून आणि निवडून घ्याव्या. साळीच्या लाह्या घेतल्या तर चाळून त्याची भात तुसाची नाकं काढून निवडून घ्याव्यात व उन्हात ठेवाव्यात. नंतर कढईत साजूक तूप घालून त्यात मोहरी, जिरे, थोडी हळद, मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, दाणे व खोबऱ्याचे काप घालून मंद आचेवर खमंग फोडणी करावी. दाणे खमंग तळले गेले की त्यातच सैंधव मीठ घालावे गॅस बंद करून लाह्या घालाव्यात.
तसेच चविनुसार मीठ आवडत असल्यास २ टी स्पून पीठीसाखर, घालून नीट ढवळून घ्यावे. फोडणी सर्वत्र सारखी लागली की गॅस परत सुरू करून मंद आचेवर चिवडा लाह्या कुरकुरीत होईपर्यंत परतावा व गार झाल्यावर डब्यात भरावा.
टीप :
साजूक तुपातल्या फोडणीने स्वादिष्ट होतो, तेल वापरायला हरकत नाही. दाण्यांऐवजी फुटाणे वापरले तरी उत्तम होतो. साळीच्या लाह्या उन्हात वाळवून त्याला नुसता साजूक तूप मीठाचा हात लावून बशीत किंवा वाटीत लहान मुलांपुढे ठेवावा (१० महिने, १ वर्षाची) मुलं हाताने या लाह्या आवडीने खातात.
MUMBAI UNIVERSITY: सिनेट निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर