पाटवड्या हा विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश अशा महाराष्ट्राच्या विविध भागात केला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने केला जाणारा हा अतिशय खास पदार्थ आहे. बेसनाच्या पिठाचे एरवी आपण, सुरळीच्या वड्या, पिठले आणि धिरडे असे बरेच प्रकार करतो. बरेचदा पाटवड्या म्हटल्यावर अनेकांना पाटवडीचा रस्सा आठवतो. पण महाराष्ट्रीयन पाटवड्या रश्श्यासोबत न खाता त्या नुसत्याच खाल्ल्या जातात. झटपट होणाऱ्या आणि तितक्याच चविष्ट लागणाऱ्या या पाटवड्या कशा करायच्या ते जाणुन घेऊयात.
साहित्य –
मोहरी
१ वाटी हरभरा डाळीचे पीठ
हिंग
हळद
आलं
मिरची
आंबट दही
पिठीसाखर (चवीनुसार)
मीठ (चवीनुसार)
३ चमचे तेल
कृती –
सर्वप्रथम १ वाटी हरभरा डाळीचे पीठ घ्या. ते पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचे म्हणजे त्यातील गठुळ्या फुटायला मदत होते. त्या पिठामध्ये हिंग आणि हळद घालावी.त्यानंतर त्यात मीठ आणि अगदी चवीपुरती पिठीसाखर घालावी. एका वाटीत थोडस आंबट दही घ्या. त्यात दहीत पाणी घालून त्याचे ताक करायचे. मिक्सरच्या भांड्यात मिरची आणि आले चांगले बारीक करुन घ्यायचे. हे बारीक केलेले मिश्रण आणि ताक हे डाळीच्या पीठात घालून चांगले ढवळून एकजीव करावे. गॅसवर कढई ठेवल्यावर त्यामध्ये ३ चमचे तेल घालून मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर मग यात हिंग आणि हळद घालावी. त्यानंतर डाळीच्या पीठाचे मिश्रण घालून ते सतत हलवत राहावे. पीठ थोडे घट्टसर होत आले की, या मिश्रणावर १-१ मिनीटासाठी झाकण ठेवून चांगली वाफ आणावी म्हणजे डाळीच्या पिठाचा कच्चेपणा हा कमी होतो. एक थाळी घेऊन त्याला व्यवस्थित तेल लावायचे. त्यानंतर हे मिश्रण चांगले एकसारखे थापून घ्यायचे. नंतर वड्या एकसारख्या कापून घ्यायच्या. त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा. तयार आहेत सोप्या पद्धतीने केलेल्या पाटवड्या.
हे ही वाचा:
ग्रीक चवीच्या काकडीचं करा आता ‘ग्रीक कुकुंबर रायता
पावसाळ्याच्या दिवसात खूप आळस आणि थकवा येतोय? मग ‘हे’ Energy boost food नक्की ट्राय करा