कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतामध्ये खूप उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. हा सण भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्री कृष्णाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचे आयोजन केले जाते. दहीहंडी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेचाच भाग मानला जातो. भारतात अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच आपल्याकडे कोणताही सण असला की खास मेजवानीचा बेत असातोच. श्रीकृष्ण जन्माष्टमीला एक वेळ उपवास करतात व रात्री श्रीकृष्णाना नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो. गोकुळाष्टमीला कोकणात आंबोळ्या, काळ्या वाटण्याचा रस्सा, शेवग्याची भाजी असा बेत बनवला जातो. या दिवशी उपवासाला भात खाणे हे वर्ज्य असते, त्यामुळे तांदळाच्या पिठाच्या आंबोळ्या केल्या जातात.
आता आंबोळ्या हा जितका वाटतो तितका काही सोप्पा पदार्थ नाही, कमीत कमी सामग्री वापरून होणाऱ्या या आंबोळ्यांमध्ये साहित्याचं प्रमाण कमी अधिक झाल्यास हा बेत फसू शकतो. काहीवेळा तर पीठ चांगले आंबवले नाही तर तव्यावर पीठ पसरवता ही येत नाही. विशेषतः पावसाळ्यात हवामान थंड असल्याने पीठ पटकन आंबतच नाही. या सगळ्या प्रश्नांवर काही टिप्स जाणून घेऊयात.
आबोळ्याचे पीठ बनवण्यासाठी तांदूळ हे ८ तास आधी भिजवून ठेवावे, तसेच पीठ वाटून झाल्यावर सुद्धा ८ तास आंबण्यासाठी लागतात. त्यामुळे तुम्हाला आजचपासूनच प्रक्रिया सुरु करावी लागेल. आंबोळ्यांचे पीठ वाटताना ते सरसरीत वाटावे.आंबोळ्याच्या वाटपात थोडा शिजवलेला भात वाटून घेतल्यास त्याला मऊपणा येतो. आंबोळ्या पांढऱ्या शुभ्र करण्यासाठी त्यात ओले खोबरे घालावे. पीठ आंबवण्यासाठी वाटल्यावर लगेच त्यात मीठ व अगदी किंचित खाण्याचा सोडा घालावा. पीठ वाटताना त्यात थोडेसे भिजवलेले पोहे ही वाटून घ्या.
आंबोल्यासाठी पीठ हे शक्यतो अल्युमिनियमच्या डब्यात ठेवावे यामुळे आंबवण्याची प्रक्रिया ही जलद होते आणि पीठ वाटून झाल्यावर त्यात थोडे कोमट पाणी ही घालावे. या दरम्यान अनेकांना पीठ तव्याला चिकटण्याची समस्या येते. यावर उपाय म्हणजे आपण बिड्याचा तवा वापरावा. हा तवा थोडा जाड असल्याने पीठ ही चिकटत नाही. जेवढा जुना व वापरातील तवा असेल तेवढे उत्तम असते. आंबोळ्या करत असताना, तव्यावर पीठ टाकताण्याच्या आधी कांद्याने तेल लावून घेतले जाते. मात्र उपवासात कांदे वापरायचे नसल्याने आपण नारळाची शेंडी वापरून तेल लावून घ्यावे, यानंतर त्यात थोडे मीठ घातलेले पाणी शिंपडून मग पीठ तव्यावर घालावे.
हे ही वाचा:
वाडगाभर सायीचे आता घरीच करा रवाळ साजूक तूप, घरच्या घरी तूप बनवणे आता सोपे
नुसता कांदा खाण्यापेक्षा ‘हे’ चटपटीत पदार्थ बनवा