Soya Pulao Recipe: सोयाबीनची भाजी, सोयाबीन पराठा किंवा सोया चिल्ली असे पदार्थ तुम्ही कायमच खात आला असाल. पण तुम्ही सोयाबीनचा पुलाव खाल्ला आहे का? सोयाबीन घालून केलेला पुलाव अगदी चविष्ट आणि पौष्टीक असतो. त्यातच जर तुम्हाला स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हा सोयाबीन पुलाव बनवून बघा.
सोयाबीन पुलाव बनवण्याचे साहित्य:
- 1/2 किलो तांदूळ
- दिडशे ग्रॅम सोयबिन वडी
- 2 कांदे
- 2 टोमॅटो
- 3 चमचे आलं लसूण मिरची पेस्ट
- 3 पळी तेल
- 1 चमचा जीरे
- 1 चमचा राई
- 1/2 चमचा हिंग
- 3 चमचे मसाला
- 2 चमचे हळद
- 2 चमचे गरम मसाला
- चवी प्रमाणे मीठ
- भरपूर कोथिंबीर
- अख्खा खडा मसाला
सोयाबीन पुलाव बनवण्याची कृती :
सर्वप्रथम सोयाबीन गरम पाण्यात पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर उकळून घ्या. त्यानंतर दुसऱ्या भांड्यात तांदूळ स्वच्छ धुऊन पूर्ण पाणी काढून ठेवा. मुख्य प्रक्रियेला सुरुवात करताना कुकर गॅसवर ठेऊन त्यात थोडे जास्त तेल घाला. तेल चांगलं गरम झालं की त्यात अख्खा खडा मसाला, लसूण, मोहरी, जिरे आणि हिंग घालून ती फोडणी चांगली परतवून घ्या. नंतर त्यात काजू, टोमॅटो,कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट फोडणीला घालून चांगले परतून घ्यावे व नंतर हळद,मसाला, गरम मसाला घालून सर्व मिश्रण एकजीव करावे. मग सोयाबीनचे अतिरिक्त पाणी काढून टाकावे किंवा सोयाबीनच्या वड्या थोड्या थोड्या हातात घेऊन त्याचे पाणी काढून टाकावे. त्यानंतर या सोयाबीन वड्या त्या फोडणीत घालून ते मिश्रण परतून घ्यावे. नंतर त्यात धुतलेले तांदूळ घालून सर्व एकजीव करावे व प्रमाणात पाणी घालून वरून मीठ घालावे. कुकर बंद करून दोन शिट्या करून घेणे व नंतर दोन मिनिटे बारीक करून गॅस बंद करावा थंड झाल्यावर कुकर उघडून त्यात भरपूर कोथिंबीर घालावी आणि तयार पुलाव सर्व्ह करावा.