spot_img
Saturday, January 11, 2025

Latest Posts

मकरसंक्रातीला नायलॉन मांजा वापरला तर दाखल होणार गुन्हा

धाग्याचा व्यापार करून भारतीयांनी पतंगबाजीला एका अलिखित खेळाचं स्वरूप दिलं आणि त्यातून दुसऱ्याचा पतंग काटण्यासाठी तयार करण्यात आला मांजा. हाच मांजा प्रत्येक ठिकाणी इतका जीवघेणा ठरतोय की मनुष्यवधासारखे गंभीर गुन्हे देखील त्यामुळे व्हायला लागलेत.

धाग्याचा व्यापार करून भारतीयांनी पतंगबाजीला एका अलिखित खेळाचं स्वरूप दिलं आणि त्यातून दुसऱ्याचा पतंग काटण्यासाठी तयार करण्यात आला मांजा. हाच मांजा प्रत्येक ठिकाणी इतका जीवघेणा ठरतोय की मनुष्यवधासारखे गंभीर गुन्हे देखील त्यामुळे व्हायला लागलेत. हैदराबादचा कागद, उत्तर प्रदेशची काच आणि बरेलीचा मांजा असला की पुढच्या पतंग कटलाच म्हणून समजा. मांजा डोर चरखी लोटाई फिरकी पतंगाचा धागा अशा नावाने ओळखला जाणारा हा कापूस मांजा अनेक वर्षांपासून आत्तापर्यंत संक्रांतीच्या सणाला लोकांना आनंद देत होता. पण आज बरेलीचा ओरिजनल मांजा मागे पडून चायनीज मांजा आलाय आणि सगळं काही बिनसलं. आता हा चायनीज मांजा आहे तरी काय? चायनीज मांजा नावाचा हा प्रकार चायनीज मोनोकिट नावाच्या कंपनीने बेंगलोर मध्ये सुरू केला. आता प्लास्टिक मांजा अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी लोकांनी त्याला चायनीज मांजा असं नाव दिलं. मुळात चीनमधून कोणताही मांजा येत नाही. म्हणजेच काय तर भारतातच प्लास्टिक नायलॉन पासून बनवलेल्या मांज्यालाच चायनीज मांजा म्हटलं जातं. म्हणजेच चिनी मांज्यांसाठी सुतापासून तयार केलेला दोरा वापरला जात नाही. प्लास्टिक व नायलॉनच्या दोऱ्यापासून हा मांजा तयार होतो. त्यासाठी विशिष्ट प्रकारचा घोळ तयार करून त्यात काचेचे बारीक तुकडे टाकले जातात. धातू व लोखंडाचा भुगा टाकून ॲल्युमिनियम ऑक्साईड व झिरकोनियम ऑक्साईडचा वापरही त्यात असतो. त्यामुळे साहजिकच हा मांजा धारदार शस्त्राप्रमाणे होतो. यामुळे पतंग उडणाऱ्या स्पर्धेत दुसऱ्या प्रतिस्पर्धेची पतंग सहज कापली जातात. पण या मांजामुळे पतंगापेक्षा माणसांचे गळे जास्त कापलेत असं दिसतंय. म्हणजे अनेक ठिकाणी एकाचा हात, मान तर डोळ्याच्या बाजूचा भाग कापला गेलाय असे असंख्य उदाहरण आपल्याला देशभरात पाहायला मिळतील. आल्या दिवशी अनेक ठिकाणी लोक गंभीर जखमी झाले इतकंच नाही तर काहींचा जीवही गेलाय. त्या अनुषंगाने मांजा संदर्भात अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झालेत. मग असं असूनही हा मांजा बाजारात मिळतो तरी कसा?

आता चायनीज आणि कॉटन मांजा कसा ओळखायचा? यामध्ये चायनीज मांजा हा प्लास्टिकचा बनलेला असतो, तो लवकर तुटत नाही. हाताने तोडल्यावर आपले हात कापले जातात. तीन ते चार किलोचा कोणताही पदार्थ उचलावा लागला तर चायनीज मांजा त्याचे ओझे आरामात उचलतो. त्याच वेळी कापसाचा मांजा इतका मजबूत नसतो, तो पटकन तुटतो. कापसाच्या मांज्यामुळे काहीही धोका निर्माण होत नाही. हा मांजा तयार करण्यासाठी पारंपारिक पद्धत आहे. यामध्ये लाकडाच्या लांब बांबूमध्ये धागे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बांधले जातात. कच्च्या कापसाच्या धाग्यात रंग शिजवलेला भात, डिंक काचेची पावडर, औषधी वनस्पती इत्यादी मिसळून लगदा तयार केला जातो. हा लगदा धाग्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासला जातो. त्यात सहा धाग्यांचा मांजा, नऊ धाग्यांचा मांजा व बारा धाग्यांचा मांजा असे प्रकार असतात.

आता पतंग काटण्यासाठी नायलॉनचाच मांजा पाहिजे का? तर बिलकुल नाही पतंगाचे वजन आणि उडवण्याची कला चपळता यावर पेच घेतली जाते. हवेचा अंदाज घेऊन ढील द्यायची की घिसेट मारायची हे ठरवायचे असते. पतंग काटण्यासाठी खास बरेलीचा मांजा पाहिजे आणि विशेष म्हणजे हा मांजा सुती धाग्यापासून तयार करायचा. इतकं सगळं असूनही जर तुम्ही हे सुती धाग्यापासून बनवलेले मांजा वापरत नसाल तर तुमच्यापुढे अनेक अडचणी येऊ शकतात. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलं जर नायलॉन मांजा वापरताना दिसली तर त्यांच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल. आता तर पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचलली असून यापुढे कलम ११० चा गुन्हा म्हणून कार्यवाही करण्यात येणार आहे. भारतीय न्यायसंहितेनुसार कलम ११० म्हणजेच सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे. आता यात तीन वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. जुन्या दंड संहितेप्रमाणे हे कलम ३०८ नुसार कार्यवाही होते अर्थात इतर ठिकाणी यानुसार कार्यवाही होऊ शकते अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे केवळ मांजा विकणाऱ्यांच्या विरोधातच नाही तर नायलॉन मांजा वापरताना कुणी दिसलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते.

Latest Posts

Don't Miss