कोणत्याही प्रकारची शॉपिंग असो, मग ती खायचे काही पदार्थ असोत किंवा कपडे, दागिने असोत किंवा घरातल्या वस्तू, या सगळ्याच वस्तू खरेदी करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय प्रचलित होत आहे. घर, ऑफिस किंवा प्रवास आपण कुठेही असलो तरीही एका क्लिकच्या आधारावर सर्व काम सोपं झालं आहे. घरबसल्या एक क्लीक केलं की झालं, असं असले तरीही ऑनलाईनच्या या बाजारात फसवणुकीचे प्रमाण सुद्धा वाढतांना दिसून येत आहे.
घर, ऑफिस किंवा प्रवासात असलो तरी प्रत्येक व्यवहार एका क्लिकवर होत असल्याने ‘केवायसी अपडेट’चे काम घरबसल्या ऑनलाइनद्वारे होईल, या विचारात तुम्ही असाल, तर खबरदारी घ्या. या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. अशीच एक घटना कल्याणमध्ये घडली होती. रेल्वेतून निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीस १० तारखेपर्यंत केवायसी अद्ययावत न केल्यास बँक खाते बंद होईल, असे फोनद्वारे सांगण्यात आले होते. समोरच्या व्यक्तीने या ज्येष्ठाकडून एटीएम कार्डसह बँक खात्याची माहिती घेतली आणि या व्यक्तीच्या बँक खात्यामधील पैसे परस्पर काढण्यात आले. शिवाय, मुदत ठेवींवर कर्जही काढले. गेल्या काही वर्षांत संपूर्ण राज्यात केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. या फसवणुकीबाबत पोलिसांकडे अनेक तक्रारी येत असून गंभीर बाब म्हणजे फसवणुकीच्या जाळ्यात उच्चशिक्षित नागरिकही अडकत आहेत. सद्यस्थितीत क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगार क्रेडिट कार्ड अद्ययावत करण्याबाबतही फोन किंवा मेसेज करून नागरिकांच्या क्रेडिट कार्डमधून परस्पर पैसे काढून घेत आहेत.
अनेकदा गुन्हेगार फसवणुकीसाठी क्विक सपोर्ट अॅपचा वापर करतात. तसेच, नेटबँकिंग अद्ययावत करण्याचे कारण देऊनही गुन्हेगार फसवणूक करत असले तरी फसवणुकीसाठी ज्येष्ठ नागरिकांना गुन्हेगार अधिक लक्ष्य करत असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा :
धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीजेची योग्य तारीख, शुभ मुहूर्त जाणून घ्या
‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव झळकणार हटके भूमिकेत