नोव्हेंबर-डिसेंबर या हिवाळ्यातील महिन्यात फिरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बरेच पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचे ठरवतात. अशावेळी, भारतातील थंड हवेची तसेच, स्वस्तात मस्त अशी ठिकाणे कोणती आहेत? याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
१. जैसलमेर (राजस्थान) :
राजस्थान या ठिकाणी उन्हाळ्यात जास्त उन्हामुळे जाणे शक्य नसल्याने पर्यटक नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात येथे जाण्याचा प्लॅन करू शकतात. राजस्थान येथील जैसलमेर हे ठिकाण फिरण्यासाठी उत्तम असून तेथील वातावरण, स्थानिक बाजारपेठा, किल्ले, राजवाडे, राजेशाही थाट पर्यटकांना भुरळ घालणारा असतो. गोल्डन सिटी म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण वाळवंटातील सफारी, उद्याने, जैन मंदिरे, ताजिया टॉवर यांमुळे प्रसिद्ध झाले आहे.
२.उज्जैन (मध्यप्रदेश):
मध्य प्रदेशातील अनेक शहरांपैकी उज्जैन हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आहे. या शहरातील सर्वात मोठे आकर्षण असलेल्या महाकालेश्वर मंदिराला पर्यटक भेट देऊ शकतात.
३. कुर्ग (कर्नाटक):
भारताचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे दक्षिण भारतातील छोटेसे हिल स्टेशन म्हणजे कर्नाटकातील कुर्ग हे ठिकाण. येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांचा आनंद द्विगुणित करेल. ट्रेकिंग प्रेमींसाठी उत्तम असणाऱ्या कुर्ग या ठिकाणी गोल्डन टेम्पल आणि व्हाईट वाटर राफ्टींगची सोय आहे.
४. मनाली (हिमालय):-
बर्फाच्छादित आणि डोंगराळ ठिकाणी जाण्याची इच्छाअसणाऱ्या पर्यटकांसाठी हिमालयातील मनाली हे उत्तम ठिकाण आहे. या काळात जास्त बर्फवृष्टी नसल्याने पर्यटक येथे सहज फिरू शकतात. देवदाराच्या जंगलांनी वेढलेल्या प्रदेशामुळे या ठिकाणाचे सौंदर्य खुलून येते. स्केटिंग आणि रॉक क्लायम्बिंगला पर्यटक पसंती देतात.
५. गोवा:
ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या दृष्टीने तरुणाईला वेड लावणारे ठिकाण म्हणजे गोवा. येथे होणारे म्युजिक फेस्टिव्हल आणि पार्टीला पर्यटक आवर्जून उपस्थित राहतात. समुद्रकिनारा आणि निसर्ग देखावा पाहण्यासाठी अनेकजण गोव्याच्या सहलीचा बेत आखतात.
खर्च किती?
राहण्याचा, खाण्याचा आणि शॉपिंगचा खर्च आटोक्यात ठेऊन अंदाजे किती बजेट असणे गरजेचे आहे, ते पाहूया..
-जैसलमेर या ठिकाणी ४ दिवस आणि ३ रात्रींसाठी फिरायला जायचे असेल तर १० ते १२ हजार रुपये इतका खर्च येतो.
-उज्जैनला जाण्यासाठी 2 रात्री आणि 3 दिवसांचा खर्च 8 ते 10 हजार रुपयांपर्यंत होतो.
-कुर्गला ३ दिवस आणि २ रात्रींसाठी १५ हजार इतका खर्च येतो.
-मनालीला जाण्यासाठी ३-४ दिवसांचे १० ते १२ हजार रुपये मोजावे लागतात.
-गोव्याच्या किनाऱ्याला भेट देण्यासाठी ४ दिवस आणि ३ रात्रींसाठी १२ ते १५ हजार रुपये खर्च येतो.