कोणाचे लग्न असेल तर खरेदीचा विषय मुख्य मानला जातो. विधीनुसार कपड्यांची, दागिन्यांची आणि इतर गोष्टींची खरेदी केली जाते. सर्व वस्तूंचा बजेट ठरवून त्यानुसार वस्तू विकत घेतल्या जातात. लग्नविधी सुरु होण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत प्रत्येक गोष्ट सुरळीत व्हावी, या दृष्टीने कुटुंबाचे प्रयत्न सुरु असतात. अशावेळी, अचानक एखादी अडचण येऊन लग्न रद्द झाले तर? किंवा अज्ञात व्यक्तीकडून लग्नात चोरी झाली तर? कोणत्यातरी कारणामुळे अचानक आग लागली तर ? किंवा मग भूकंपासारखी कठीण नैसर्गिक आपत्ती आली तर? जर या घटना घडल्या तर लग्नासाठी केलेल्या खर्चाचं काय? झालेली नुकसान भरपाई कोण करून देणार? या प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात घेणार आहोत.
लग्न समारंभाच्या मंगलप्रसंगी अशा गोष्टी झाल्या तर लग्नाचा विमा यासाठी उपयुक्त ठरू शकतो. लग्नाचा विमा (Marriage Insurance) म्हणजे अचानक उद्भवलेल्या संकटावर नुकसान भरून काढणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. लॉकडाऊनच्या काळात झालेल्या लग्नानंतर भारतात या संकल्पनेची मागणी वाढली आहे. ICICI Lombard General Insurance, Future General आणि HDFC ERGO यांच्यामार्फत लग्नाचा विमा दिला जातो.
लग्नाच्या विम्यात कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?
घटनास्थळी भूकंप, आग किंवा संबंधित धोके, कार्यक्रमाच्या ठिकाणी घरफोडी आणि चोरी, काही कारणामुळे लग्न रद्द झाल्यास, लग्नाच्या तारखेत बदल झाल्यास, मालमत्तेचे भौतिक नुकसान झाल्यास, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, कायमचे अंशत: अपंगत्व, अपघाती मृत्यू या गोष्टींचा समावेश लग्नाच्या विम्यात केला जातो.
लग्नाच्या विम्यात कोणत्या गोष्टींचा खर्च कव्हर केला जाईल?
१. लग्न पत्रिकांची छपाई
२. केटरर्सला केलेला खर्च
३. मंडप आणि सजावट
४. हॉटेल बुकिंग खर्च
५. बस-कार बुकिंगचा खर्च
६. लग्न स्थळाला दिलेली आगाऊ रक्कम
लग्नाच्या विम्यात कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही?
लग्नाच्या दिवशी कोणताही संप किंवा बंद असेल, दहशतवादी हल्ला झाला असेल, वधू किंवा वराचे अपहरण झाले असेल, ट्रेन किंवा फ्लाइट चुकली असेल, वाहनाची किंवा वाहतूक सेवेत बिघाड असेल या कारणांमुळे जर लग्न रद्द झाले तर, विमा कंपनी नुकसान भरून देत नाही. अशाप्रकारे, अचानक अडचण आल्यास नुकसान भरपाई मिळावी यासाठी लग्नाचा विमा असणे आवश्यक आहे.
हे ही वाचा :
कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा