कोकणी माणूस हा देवभोळा असतो. तो देवाला प्रचंड मानतो आणि तितकाच देवाला घाबरतो. याच कोकणभूमीत अगदी परशुराम ते पत्रादेवी पर्यंत अनेक देवदेवतांच्या जत्रा आणि उत्सव होत असतात. या सगळ्या उत्सवात प्रचंड लोकप्रियतेने आणि श्रध्देने साजरी केली जाणारी जत्रा म्हणजे मालवणच्या आंगणेवाडीच्या भराडी देवीचा जत्रोत्सव. ही देवी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते अशी लाखो भाविकांची धारणा आहे. यंदा हा जत्रोत्सव विशेष आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे या १२ किलोमीटर अंतरावरील गावात आंगणेवाडी आहे.आंगणे कुटुंबियांच्या या वाडीतील भरडावर म्हणजेच माळावर ही देवी बसली आहे म्हणून तिला भराडी देवी म्हणतात. ही देवी भक्तांची मनोकामनापूर्ण करते अशी भक्तांची धारणा आहे. ९० च्या दशकात नारायण राणे यांना शिवसेनाप्रमुखांनी विधानसभा निवडणुकीसाठी कोकणातील मालवण विधानसभा लढवण्याचा आदेश दिला. त्यानुसार ते कोकणात आले. नारायण राणे यांची राजकीय सुरुवात मुंबईत झाली होती. ते प्रतिष्ठेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांची अनेक मित्रमंडळीही मुंबईतील होती. ही मंडळी कोकणात आली आणि भराडी देवीच्या जत्रेबद्दल या सगळ्या शिवसैनिकांनी कर्णोपकर्णी मोठ्या प्रमाणात प्रसार केला. या देवीला मनोभावे साकडं घातलं तरी ती भक्तांच्या हाकेला धावते असं भक्तांना वाटू लागलं. त्यानंतर या जत्रेच्या उत्सवाला वर्षागणिक गर्दी वाढत गेली. यंदा तर आंगणेवाडीच्या भराडीने याच राणे कुटुंबाला भरभरून आशीर्वाद दिला आहे. गेली ४० वर्षे नारायण राणे न चुकता या आंगणेवाडीच्या जत्रेला उपस्थिती देत आहेत.
यंदा नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्यावर ४८ हजार मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांचा धाकटा मुलगा असलेल्या नितेश राणे यांना राज्य मंत्रिमंडळात मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्रालय मंत्री म्हणून स्थान मिळालं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांच्याकडेच सारी सत्ता आहे. राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश राणे हे माजी खासदार आहेत. २०१४ मध्ये ठाकरेंचे विश्वासू असलेल्या विनायक राऊत यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव केला. त्यानंतर निलेश राणे राजकीय विजनवासात गेले होते. ते पुन्हा संसदीय सत्तेत सक्रीय होण्यासाठी प्रचंड संघर्ष करत होते. मात्र त्यांना सूर सापडत नव्हता. गेल्यावर्षी त्यांनी भराडीदेवीला साकड घातलं आणि ते देवी स्थानापन्न असलेल्या मालवण कुडाळ मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले. अत्यंत चुरसमय झालेल्या निवडणुकीत त्यांनी ठाकरेसेनेच्या वैभव नाईक यांचा पराभव केला. विशेष म्हणजे हॅट्रिककडे डोळे लावून बसलेल्या नाईक यांचा पराभव करण्यासाठी आपला भाजप पक्ष सोडून मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता.
गेल्या ४० वर्षांत राणे कुटुंबीयांनी कोकणाला आपले पॅालिटिकल टर्फ बनवलंय. राजकीय दुर्लक्षित असलेला हा भाग नारायण राणेंच्या कार्यशैलीमुळे आणि राजकीय विकासाने चर्चेत आला. याच भागाने राणेंना राजकीय आसमानही दाखवलं. कारण नारायण राणेंनी देवही खाली आला तरी मला हरवू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्याच राणेंनी राजकीय निवृत्तीच्या वाटेवर असताना कोकणी माणसाला ‘माझी शेवटची राजकीय निवडणूक लढतोय’ अशी साद घातली आणि त्यांच्या विरोधकांनीही त्यांना सहकार्य करत खासदार करत दिल्लीत पाठवले. अर्थात त्याआधी राणे दिल्लीत पोहोचले होते पण राज्यसभेत खासदार म्हणून. हा त्यांचा दिल्ली प्रवास बॅकडोअरने झाला होता. लोकनेता असलेल्या राणेंना हे शल्य सलत होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची परकाष्ठा करत लोकसभा जिंकली. दोन्ही मुलांना राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली. अगदी गल्ली ते दिल्ली राजकीय प्रभाव पाडण्यासाठी देवी भराडीने राणे कुटुंबाला आशिर्वाद दिले आहेत.
आता नारायण राणे कुटुंबिय कोकणी माणसाच्या विकासाला नवं कोंदण कसं देणार आणि रखडलेले विकास प्रकल्प कसे मार्गी लावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राणे कुटुंबाची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे. हे कुटुंब आपल्या वाटेला आलेलं प्रेम आणि द्वेष दोन्ही विसरत नाही. त्यानुसार प्रेम देणाऱ्यांवर प्रेम करतात आणि आपल्या वाटेत येणाऱ्यांना पुरतं आडवं करण्याची भाषा करतात. त्याला अनेकदा कृतीची जोडही देतात. मात्र आता दिवस बदलले आहेत. सोबत येणाऱ्यांसह न येणाऱ्यांचाही विकास करावा लागतो. दुजाभाव न करता कोकणचा विकास करण्याची संधी भराडी देवीच्या आशिर्वादाने कोकणी माणसाने राणे कुटुंबाला दिली आहे. या भागात आजही आरोग्य, जलसंधारण, वनजमीनी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्हा परिषद ते संसद व्हाया मंत्रालय हे प्रश्न तिन्ही राणे मिळून धसास लावू शकतात. तिघांनीही येणाऱ्या वर्षात आपापल्या मतदारसंघात सकारात्मक विकासकामाचे योगदान दिले तर तीच या कुटुंबाकडून देवीची खरीखुरी सेवा ठरू शकणार आहे. जिल्ह्यात अनेक देवस्थानांना सढळ हस्ते मदत करण्यात आघाडीवर असलेल्या या तिघांकडून कोणतीही अढी मनात न ठेवता केलेल्या विकासाचे कोकणाला वेध लागले आहेत. ४० वर्षातला राणे कुटुंबाचा हा राजकीय सुवर्णकाळ आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आता हे पिता- पुत्र तळकोकणातील कोकणी माणसाला कधी सोन्यासारख्या दिवसांची प्रचिती देतात हे पहायचंय.
गणेशोत्सवासाठी POP आणि उंच मूर्तींना बंदी; मुंबई महानगरपालिकाकडून परिपत्रक जारी
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.