नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटात साडेचार महिन्यांचा गर्भ असल्याचे निदान काही दिवसांपूर्वी जिल्हा महिला रुग्णालयात झाले होते. या दुर्मिळ घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या गेले. स्त्री रुग्णालयात १ फेब्रुवारीला सायंकाळी डॉक्टरांनी या महिलेचे यशस्वी सिझर केले. महिलेने मुलास जन्म दिला असून, बाळ आणि माता दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.
पाच लाखांमधून एक आढळणाऱ्या या प्रकाराला वैद्यकीय भाषेत ‘फिटस इन फिटो’ म्हटले जाते. नऊ महिन्यांची गर्भवती असलेली ३२ वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी सोनोग्राफी केली असता महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटामध्ये आणखी एक अर्भक असल्याचे निदान झाले होते. बाळाच्या पोटात साडेचार महिन्यांचे अर्भक होते. निदानानंतर समुपदेशन करत कुठलाही धोका नसल्याचे गर्भवतीस सांगण्यात आले होते.
दरम्यान, १ फेब्रुवारीला प्रसववेदना सुरू झाल्याने महिलेस नातेवाईकांनी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले. कर्तव्यावरील डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांना कळविले. ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांच्या कानावर घालण्यात आली आणि वेळ न दवडता महिलेची प्रसूती येथेच करण्याचे ठरविण्यात आले. सायंकाळी साडेसात वाजता महिलेस ‘ओटी’त घेऊन सिझर करण्यात आले. महिलेच्या गर्भात पूर्णतः वाढ झालेल्या बाळाच्या पोटात आणखी एक गर्भ दिसत असल्याने ही केस डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होती. सिझर करून महिला व अर्भक दोघांचाही जीव वाचविणे महत्त्वाचे होते. त्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ सज्ज ठेवण्यात आले होते. जन्माला आलेले बाळ २ किलो ३०० ग्रॅम वजनाचे आहे. त्याला नवजात शिशू विभागात ठेऊन रात्रभर उपचार करण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला अमरावती येथील संदर्भीय सेवा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी दिली.
हे ही वाचा :
CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?
Follow Us