spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; नीलम गोऱ्हे यांनी दिले कठोर कारवाईचे निर्देश!

नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्ष करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्ष करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर घटना उघडकीस आली असून अकरावी बारावीच्या त्यावेळी अज्ञान असलेल्या मुलींच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार व ब्लॅकमेलिंग केल्याचे समजते. या प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर शहर पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.

पोलिसांनी या एका तक्रारीच्या आधारे अजून तीन फिर्यादीं चा शोध घेऊन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. स्वयंप्रेरणेने केलेली ही कार्यवाही दखलपात्र व मानवी अधिकाराबाबत सजगता दाखवून देणारी आहे, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूर पोलीस आयुक्तांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.संबंधित प्रकरणातील सर्व आरोपी यांना कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी. मागील नऊ-दहा वर्षापासून आरोपीकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याने याबाबत सबळ पुरावे संकलित करण्यात यावेत व सत्वर चार्जशीट दाखल करण्याची दक्षता घ्यावी.

साक्षीदार सुरक्षा कायद्यांतर्गत संबंधित पीडित महिला साक्षीदार यांना योग्य संरक्षण पुरवण्याची कार्यवाही करावी. त्यांच्या नावांबाबत गोपनीयता राखण्यात यावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयासमोर चालवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्याचबरोबर आरोपीस कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने अनुभवी व निष्णात  सरकारी वकील नियुक्त करण्यात यावेत. समुपदेशनातून देखील अत्याचार होत असल्याने आता महिला समुपदेशक नियुक्त करून त्यांच्यामार्फतच संबंधित महिलांना योग्य समुपदेशन मिळावे यासाठीची तरतूद करावी. तसेच नियमितपणे समुपदेशन घेणाऱ्या व्यक्तींकडून निरपेक्ष व स्वतंत्र यंत्रणांकडून समुपदेशन प्रक्रियांचे मूल्यमापन करण्यात यावे. मुलींचे स्वमदत गट करून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम विश्वासार्ह महिला संस्थांतर्फे करून घेण्यात यावे. त्याचबरोबर या प्रकरणी शासकीय पंचांची नियुक्ती करून तपासामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

Latest Posts

Don't Miss