spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

अजित पवारांनी बीडमध्ये गुन्हेगारांना इशारा; वेळ पडल्यास अशा लोकांवर मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही

आज उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये दाखल झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यात कोणी कुठल्या गोष्टीसाठी जबाबदार असेल, जर कोणी वेडेवाकडे प्रकार करणार असेल किंवा कोणी विकासकामांच्या आड येत असेल तर मी ते खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास अशा लोकांवर मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. जिथे तथ्य असेल तिथे कारवाई केली जाईल, पण जिथे तथ्य नसेल त्या वेळी कारवाई केली जाणार नाही अश्या रोखठोक शब्दांत पालकमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. अजित पवार हे कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना धनंजय मुंडे हाताची घडी घालून त्यांच्या बाजूला उभे होते. यावेळी अजित पवार यांनी बीडमधील गुन्हेगारांना निर्वाणीचा इशारा दिला. यापुढे बीडमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

पुढे ते म्हणाले, मी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते, याठिकाणी चांगले अधिकारी पाहिजेत. मी आता बीडमधील अधिकाऱ्यांकडे बघणार आहे. काही अधिकारी बरीच वर्षे याठिकाणी आहेत. मी त्यामध्ये दुरुस्ती करणार आहे. मी काम करताना भेदभाव करत नाही. बीड कष्टकरी समाज मोठ्याप्रमाणावर राहतो. मी काम करताना जातीपाती नात्यागोत्याचा विचार केलेला नाही. बीड जिल्ह्यात जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे. जिल्ह्यात चुकीच्या गोष्टी पूर्वापार चालत आल्या असतील तर त्याला आळा घातला पाहिजे. मी बीडमधील काही लोकांचे रिव्हॉल्व्हर हवेत उंचावून, कंबरेला लावून फिरतानाचे रील सोशल मीडियावर पाहिले आहेत. पुन्हा अशा गोष्टी दिसल्या तर खपवून घेतले जाणार नाही, संबंधितांचे लायसन्स रद्द केले जाील. मी सगळ्यांना सारखा नियम लावणार. बीड जिल्ह्यात बदल झाला पाहिजे, तो मला आणि नागरिकांना जाणवला पाहिजे, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी हा गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय झाला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याची प्रतिमा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापी संरक्षण दिले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांना सांगतो की, आपलं चारित्र्य आणि प्रतिमा स्वच्छ ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोकं आपल्या आजुबाजूला राहता कामा नये, याची काळजी घ्या. यापुढे पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप चालणार नाही. मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. हे नव्याचे नऊ दिवस समजू नका, असे अजित पवार यांनी सांगितले.

काहीजण मला इकडे आल्यावर भलामोठा हार, बुके किंवा पांडुरंगाची मूर्ती देतात. पण या लोकांना साधुसंतांचे विचारही लक्षात घेतले पाहिजेत. दादा आला तर आता काही काळजी नाही, असा विचार करत असाल तर तो मनातून काढून टाका. मी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका, असे अजित पवार यांनी खडसावून सांगितले.

हे ही वाचा : 

विधीतज्ज्ञांच्या घडवणुकीसाठी उत्तम विधी महाविद्यालयांची नितांत गरज CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss