विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक महाविजयानंतर पहिल्यांदाच पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. आज साईंच्या शिर्डीत भाजपचं महाअधिवेशन पार पडत आहे. या महाअधिवेशनसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातील सर्वच प्रमुख नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी पदाधिकाऱ्यांना मार्दर्शन केलं. यावेळी चंद्रशखेर बावनकुळे यांनी भाजपच्या मंत्र्यांना काही सूचना दिल्या आहेत.भाजपच्या मंत्र्यांनी महिन्यातून एकदा खेड्यात मुक्कामी राहावं, अश्या सूचना दिल्या आहेत.
भाजप मंत्र्यांना खेड्यात मुक्काम करावा लागणार
भाजपच्या मंत्र्यांना महिन्यातून किमान एकदा खेड्यात मुक्कामी राहावं लागणार आहे. यामुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मंत्र्यांकडची कामे मार्गी लागण्यास मदत होईल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या तसेच जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत सूचना दिल्या. भारतीय जनता पक्षाच्या सर्व मंत्र्यांना आता महिन्यातून किमान एकदा एका खेड्यात जाऊन मुक्काम करावा लागणार आहे.
भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या बैठकीत प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे तसेच केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी मार्गदर्शन केले राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. खेड्यातील माणसांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील तर पक्षाच्या मंत्र्यांना खेड्यात जावेच लागेल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
खेड्यात जावं लागेल तेथे मुक्काम करावा लागेल, लोकांशी संवाद साधावा लागेल. भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांच्या कार्यालयात एक ओएसडी असा असेल, की जो फक्त पक्ष संघटनेशी संबंधित कामांकडे आवर्जून लक्ष देईल, असं बावनकुळे म्हणाले.