मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर मागण्यांसाठी अंतरवली सराटीत आजपासून (२५ जानेवारी) आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा आंदोलनाला बसले आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचे जरांगे पाटलांनी सांगितले. मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असेल. मुंबईच नाही तर राज्यातील विविध भागातून मोठ्याप्रमाणात लोक या मोर्चासाठी येत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की, आम्ही २५ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरु केले आहे. उद्या २६ जानेवारीला सगेसोयरेंची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्ष झाले मात्र समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जीआर काढून त्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे. शिंदे समितीचे काम पुन्हा सुरु करून नोंदी सापडून देण्याचे काम करावे. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅजेट लागू करावे, यासह ८ ते ९ मागण्या आम्ही सरकारकडे सादर केल्या आहेत. आमच्या नवीन मागण्या नाहीत, या जुन्याच मागण्या आहेत.”
दरम्यान विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगेच्या आंदोलनाला धार राहिली नाही, असे म्हटले . यावरून मनोज जरांगे म्हणाले की, त्यांना अंतरवलीत किती लोक आहेत बघायला येतो का म्हणावं, धार राहिली नाही म्हणे. आमची लोकं मोठे झालेले त्यांना खपतच नाही. निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला मराठा लागतात. हे मराठ्यांशी टिंगल करतात. आता तर ताकतीने मराठे येणार आहे. तुला उत्तर मराठेच देतील. मी अर्धवट सोडतो तर मग तू बोल. असले विरोधी पक्ष नेते जनतेला लाभतात. हे फक्त कामापुरते मराठ्यांना पुढे करतात, म्हणून काँग्रेस संपत आली आहे, असा पलटवार त्यांनी यावेळी केला.
हे ही वाचा :