बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. अत्याचार करणाऱ्या आरोपीचा अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर करण्यात आला होता. त्याच्या एंकॉउंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सामोवारी सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे. आता, संजय शिरसाट आणि मंत्री देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट
बदलापूरच्या घटनेमध्ये जो अहवाल सादर केला, त्यावदर न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. जो कोणी दोषी असेल, जाणून बुजून एन्काऊंटर केला असेल तर न्यायालय निर्णय घेईल. याबाबत शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
काय म्हणाले मंत्री देसाई
शंभुराज देसाई यांनी प्रकरणी बोलण्याचे टाळले. न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात मला माहीत नाही, मी संबंधित अधिकारी यांच्यासोबत बोलून माहिती घेतो, त्यांनतर बोलतो अशी प्रतिक्रिया मंत्री देसाई यांनी दिली.
अहवालात काय आहे नमूद
अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपासनजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांन स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळून आलेले नाही. मात्र, पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र, या अहवालामुळे पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे. अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरुन जमा केलेली सामुग्री आणि एफएसएल रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत. अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.
नेमकी घटना काय?
बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपाई म्हणून काम करणारा आरोपी अक्षय शिंदेने अत्याचार केला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. 12 ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर 13 ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 12 तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केले. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली.
बदलापूरमधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काऊंटर करण्यात आला होता. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना घटना घडली होती. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली. यानंतर निलेश मोरे यांच्यावर त्याने 3 गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि 2 गोळ्यांचा फायर चुकली. सोबत असलेले दुसरे अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. रिव्हॉल्व्हरमधून झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला, तर दुसरी शरिरावर लागली होती.
हे ही वाचा :
सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता Sanjay Raut यांचा भाजपला टोला
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .