Beed Farmer’s Successful Experiment: बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्यातील केळीची निर्यात सध्या इराण (Iran) च्या बाजारपेठेत सुरू आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून या शेतकऱ्याने निर्याती योग्य केळीचे पीक घेऊन त्याची निर्यात इराणकडे सुरू केली. आष्टी तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. परिणामी, या तालुक्यात पाण्याची नेहमी भ्रांत असते. त्यामुळे शेती करणे कठीण असते. परंतु, अशा असंख्य अडचणींवर मात करून आष्टी तालुक्यातील भातोडी इथल्या शंकर गित्ते या शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरली आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये पुण्यातून ७२५० रोपे आणून पाच एकर क्षेत्रावर सहा बाय पाच या पद्धतीने केळीची लागवड केली. यासाठी शेत तळ्याच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून ठिबक सिंचनाद्वारे याचे नियोजन केले. कुटुंबातील सदस्यांची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शंकर गित्ते यांनी ही बाग जोपासली आहे. ठिबक, रोपे, फवारणी, शेणखत रासायनिक, खते, मजुरी असा एकरी एक लाख तीस हजार खर्च वगळता सहा लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले आहे. सध्या केळी बागेची तोडणी सुरू झाली असून हीच केळी इराण (Iran) च्या बाजारपेठेत निर्यात केली जात आहेत.
आधुनिक शेती करण्यासाठी शंकर गित्ते यांना कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. कृषी विभागाच्या योजनेचा लाभ घेत माळरान जमिनीवर गित्ते यांनी नंदनवन फुलवले आहे. केळीच्या बागेची काळजी घेऊन आत्तापर्यंत १७५ टन एवढा माल पाच एकरात काढला गेला आहे. विशेष म्हणजे यासाठी विक्रीला कुठे न जाता थेट इराण (Iran) मधील व्यापाऱ्यांनी बांधावर या मालाची खरेदी केलीय. आतापर्यंत १३ ट्रकच्या माध्यमातून ही केळी इराणच्या बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत. शेती परवडत नाही अशी ओरड करून अनेक जण मोठ्या शहरांची वाट धरतात. मात्र आहे त्याच शेतजमिनीत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेती केल्यास, नक्कीच जिद्दीच्या जोरावर यश मिळते हेच या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.
हे ही वाचा :
सोलापूरमध्ये राजकीय उलथापालथ ! Sharad Pawar गटाचा बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार…
अजित दादांनी केला शरद पवारांना फोन, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण