महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठी उसंडी मारल्याचं दिसून आलं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीचा २३६ जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर यश मिळाले. महायुतीत एकट्या भाजपने १३२ जागा जिंकल्या.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यात पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत, यासाठी राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये सामूहिक प्रार्थना, महाआरती करुन देवाला साकडं घालण्यात आले. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, लाडक्या बहिणी, पक्षाचे कार्यकर्ते तसेच आजारातून बरे झालेल्या रुग्णांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवाकडे प्रार्थना केली.
विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा होते. त्यांच्याच कॅप्टनशीपखाली महायुतीने निवडणूक लढवली आणि मोठ्या बहुमताने जिंकली. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे तीन तास देखील झोपले नाहीत. महाराष्ट्र सुखी समृद्ध व्हावा, यासाठी ते दिवसरात्र काम करत होते. राज्यातील महिलांना स्वावलंबी करता यावे, यासाठी त्यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. याच लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात भरभरुन यश टाकले. याचे पूर्ण श्रेय महायुतीचे कॅप्टन म्हणून एकनाथ शिंदे यांना जाते. त्यामुळे ज्या भावाने आम्हाला स्वावलंबी बनवले तोच भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसावा, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह लाडक्या बहिणींची इच्छा आहे, असे शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी पुण्यातील विद्यार्थ्यांनी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणरायाची आरती केली आणि साकडं घातले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता निधीमुळे आजारातून बरे झालेल्या शेकडो रुग्णांनी आज दि. २५ नोव्हेंबरला श्री सिद्धीविनायक मंदिरात सामूहिक प्रार्थना केली. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत, अशी गणेशचरणी मनोकामना केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये शेकडो लाडक्या बहिणींच्या हस्ते महाआरती करून देवाला साकडं घालण्यात आले. नाशिक येथील शिव मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत, यासाठी पुजाअर्चा करण्यात आली. पंढरपूर येथे साधू संतानी विठ्ठल मंदिरात हवन करून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना करण्यात आली.
हे ही वाचा:
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांचं काय झालं?