spot_img
Wednesday, January 15, 2025

Latest Posts

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या हत्याप्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे. दरम्यान यातील आरोपींवर कोणत्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याची माहिती मागवली जातेय. हे गुन्हे किती गंभीर स्वरूपाचे याची पडताळणी केली जातेय. या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हे सहाही आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर दहा वर्षात दहा गुन्हे
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात घुलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. केज पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे असून मारहाणीचे चार, चोरीचा एक, अपहरणाचा एक तर 2019 मध्ये खंडणीचा एक गुन्हा आहे. अंबाजोगाई शहरात फूस लावून पळवण्याचा गुन्हा नोंद आहे.

महेश सखाराम केदार
महेश सखाराम केदार याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे असून त्यात मारामारी, चोरी दुखापत करणे तर 2023 मध्ये खुनाचा प्रयत्न करणे, असे गुन्हे आहेत. त्याबरोबरच सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

जयराम माणिक चाटे
जयराम माणिक चाटे हा 21 वर्षाचा असून त्याच्यावर 2022 ते 24 या तीन वर्षात तीन गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक गुन्हा, केज पोलीस ठाण्यात दुखापतीचा एक गुन्हा, तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

प्रतीक भीमराव घुले
प्रतीक भीमराव घुले हा 24 वर्षाचा तरुण असून त्याच्यावर 2017 ते 24 या आठ वर्षांमध्ये केज पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात मारहाण करणे, दुखापत करणे, गर्दी मारामारीत सहभाग आणि संतोष देशमुख यांच्या खुनात सहभाग असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

कृष्णा शामराव आंधळे
या प्रकरणातील आरोपी कृष्णा शामराव आंधळे हा अद्याप फरार असून 2020 ते 24 या चार वर्षात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात गर्दी जमवणे, मारामारीचे तीन गुन्हे तर 2023 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. शिवाय अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात 2023 मध्ये खंडणीचा एक गुन्हा तर केज ठाण्यात 2024 मध्ये संतोष देशमुख यांच्या खुनात आरोपी असून तो सध्या फरार आहे.

सुधीर सांगळे
सुधीर सांगळे हा देशमुख हत्या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

Latest Posts

Don't Miss