बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड उर्फ ‘आका’ चा पाय दिवसेंदिवस अधिक खोलात जाताना दिसत आहे. या हत्याप्रकरणात सीआयडीने नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून या आरोपपत्रात तपशील आता हळूहळू समोर येत आहे. वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीकडून मागण्यात आलेली २ कोटी रुपयांची खंडणी याचा थेट संबंध दाखवून देणारा महत्वाचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात या व्हिडिओचा उल्लेख केला आहे.
वाल्मिक कराड याच्या वकिलांनी आतापर्यंत त्याच्या बचावासाठी कराड याने कोणाकडूनही थेट खंडणी न मागितल्याचे सांगितले जात होते. कोणत्याही व्यक्तीने वाल्मिक कराड याने खंडणी मागितली, अशी तक्रार केलेली नाही, असा युक्तिवाद वाल्मिक कराड याच्या वकिलांनी केला होता. मात्र, आता पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्राने आता वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद केराच्या टोपलीत गेल्याचा समजत आहे.
सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आवादा कंपनीत खंडणी मागण्यासाठी गेला होता. त्यावेळी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुदर्शन घुले खंडणी मागतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला होता. या व्हिडीओतील संवाद आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये खंडणी प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हाच असल्याचे दिसत आहे. कोर्टात हा पुरावा वाल्मिक कराडसाठी मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे.
सुदर्शन घुले आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना नेमकं काय म्हणाला?
तुमचे आणि आण्णांचे बोलणे झाले होते का? तुम्ही का तस करताय? विनाकारण अडचणी वाढतील. मी इथे एकाच कारणामुळे आलोय, आण्णांचा फोन आला, काम बंद करा. पाठीमागे मी काम बंद केले होते त्यावेळी माझ्यावर तुम्ही एक एन. सी. दाखल केली होती. त्यामुळे अण्णांच्या मनात गैरसमज झाला होता. तुमचे चार-पाच ठिकाणी काम चालू आहेत, याची माहिती मी घेतली आहे. तुमचे कुठे कुठे काम चालु आहेत याची अण्णांना डायरेक्ट माहिती मिळते. मागच्यावेळी काम बंद केले होते, त्यावेळी सबटेशनचे काम चालू होते. त्यावेळी मला फोन करुन अण्णांनी सबटेशनचे काम कसं चालू आहे, याबाबत विचारले होते. तुमच्या एक एक मिनीटाचे रिपोर्टिंग वाल्मिक अण्णा यांच्याकडे असते. अण्णांनी जी डिमांड ठेवली आहे, ती तुम्ही लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल, याकडे लक्ष द्या. तुम्हाला इथं काम चालू ठेवायचं असेल तर कुणालाही विरोध करा, पण फक्त अण्णांना विरोध करु नका. आज संध्याकाळ नंतर तुमचे सर्व काम बंद करा. आज अण्णा केज येथे तहसिलला येणार आहेत. तुम्ही त्यांची भेट घ्या व यांच्याशी बोला म्हणजे तुम्हाला काम बंद करायची गरज पडणार नाही. तुमचे इथे दीर्घकाळ काम चालणार आहे. तुम्ही अण्णांच्या डिमांड पूर्ण केल्यानंतर तिथे तुमचे सगळे प्रॉब्लम सॉल केले जातील. तुम्हाला इथे शंभर जण सांभाळण्यापेक्षा तिथं एकच जागेवर सेटलमेंट राहू द्या त्यानंतर तुम्हाला कुठंच काही करायची गरज पडणार नाही, असे सुदर्शन घुले या व्हीडिओत म्हणताना दिसत आहे.
हे ही वाचा:
‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश