Bird Flu: राज्यात मागील दोन महिन्यांपासून बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात कोंबड्याना लागण झाल्याचे समोर आले आहे. यात अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र मागील काही दिवसात बर्ड फ्लूचे प्रमाण कमी झाले होते. पण आता पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने डोके वर काढले आहे. महाराष्ट्रातील धाराशिवमध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे बर्ड फ्ल्यूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पण नक्की बर्ड फ्लू म्हणजे आहे तरी काय? आणि यामुळे मनुष्याला काय धोका?
बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएन्झा (Avian influenza) म्हणूनही ओळखले जाते. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो केवळ पक्ष्यांनाच संक्रमित करत नाही तर हा विषाणू मानव आणि इतर प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो. यातील बहुतेक विषाणू पक्ष्यांपर्यंतच मर्यादित असले तरी पक्ष्य्यांसाठी हा रोग प्राणघातक आहे. परंतु, विशिष्ट परिस्थितीत तो माणसांमध्येही पसरण्याची शक्यता असते. जगभरातील अनेक देशांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेला दिसतो आणि त्यामुळे माणसांमध्ये या आजाराबद्दल भीती निर्माण झाली आहे. हा आजार मुख्यतः जंगली पक्षी आणि कोंबड्यांमध्ये आढळतो. परंतु, माणसांमध्ये संसर्ग झाल्यास तो अत्यंत घातक ठरू शकतो. म्हणूनच बर्ड फ्लूविषयी जागरूक राहणं, त्याची लक्षणं ओळखणं आणि योग्य खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे.
बर्ड फ्लू हा ‘इन्फ्लूएंझा व्हायरस’चा (Influenza) प्रकार आहे,जो मुख्यतः पक्ष्यांमध्ये आढळतो.’एच५एन१’ (H5N1) आणि ‘एच७एन९'(H7N9) हे यातील दोन घातक प्रकार आहेत, जे कधी कधी माणसांमध्ये संक्रमण करतात.हा विषाणू संक्रमित पक्ष्यांच्या थुंकी,शिंका किंवा मलमूत्राद्वारे पसरतो.मुख्यतः कोंबड्या,बदकं,आणि इतर पाळीव पक्ष्यांमधून माणसांमध्ये हा आजार पसरतो. या रोगाचे विविध प्रकार आहेत. H5N1 ह्या व्हायरस मध्ये दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता आहे. H5N1 ची लागण झालेले पक्षी १० दिवसांपर्यंत विष्ठा आणि लाळेत विषाणूच्या रूपात सोडत राहतात. दूषित क्षेत्राच्या संपर्कात आल्याने संसर्ग पसरू शकतो. दरम्यान, सतत स्थलांतर करणाऱ्या पक्षांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याने याचा धोकाही अधिक आहे.
बर्ड फ्लू चा माणसांना प्रादुर्भाव होऊ शकतो का?
बर्ड फ्लूचा H5N1 हा विषाणू पक्ष्यांपासून माणसांपर्यंत पोहोचू शकतो. जगात पहिल्यांदा अशी केस चीनमध्ये आढळली होती. १९९७ मध्ये हाँगकाँगमधील एका पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या व्यक्तीला बर्ड फ्लू झाला. तो सतत पक्ष्यांच्या संपर्कात असल्यामुळे हा विषाणू त्याच्यापर्यंत पोहोचला. हा विषाणू अत्यंत घातक आहे. एकदा संसर्ग झाला तर मृत्यूदर ६० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळेच याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. सध्या तरी माणसाकडून माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. बहुतेक प्रकरणांमध्ये, फक्त पक्ष्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाच हा विषाणू झाला आहे. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे, विशेषतः पोल्ट्री फार्म किंवा पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी अधिक सावध राहावे. ज्यांच्या घरी कुत्री, मांजर, ससा, कासव, पोपट, कोंबडी यांसारखे पाळीव पशु प्राण्यांपासून काळजी घ्या.
अनेक पक्षी या आजाराने मेले असून यामुळे चिकन-अंडी खाल्ल्यामुळे हा आजार माणसांमध्येही पसरू शकतो का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, बर्ड फ्लू माणसांमध्ये संसर्ग झाल्यास तो गंभीर आजार ठरतो, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या, अंगदुखी आणि ताप येऊ शकतो. विषाणूचा प्रादुर्भाव शरीराच्या इम्यून सिस्टीमवर परिणाम करतो, ज्यामुळे गंभीर स्वरूपाचे न्यूमोनिया होऊ शकते. ‘एच५एन१’ संसर्गामुळे मृत्यूची शक्यता जास्त असल्याचे सांगितले जात आहे. योग्य उपचार न घेतल्यास तो जीवघेणा ही ठरू शकतो. जर तुम्हाला ताप येत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, सतत खोकला आणि घसा खवखवत असेल, अंगदुखी, डोकेदुखी आणि थकवा जाणवत असेल, डायरिया किंवा उलट्या होण्याची शक्यता ही लक्षणं दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संक्रमित पक्ष्यांपासून दूर राहा आणि त्यांच्याशी थेट संपर्क टाळा. पक्ष्यांच्या मांस आणि अंड्यांचं योग्य तापमानात शिजवून सेवन करा. बाजारातून पक्षी किंवा त्यांची उत्पादने खरेदी करताना स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घ्या. नियमित हात धुणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं गरजेचं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची सवय लावा. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव असलेल्या भागांत प्रवास करण्याचं टाळा. संक्रमित व्यक्तीशी संपर्क साधताना विशेष काळजी घ्या. वैयक्तिक स्वच्छता पाळा आणि सर्दी-ताप झाल्यास लवकरात लवकर डॉक्टरांना भेटा. घरी किंवा आजूबाजूला पक्षी असल्यास त्यांची स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घ्या. सरकार किंवा आरोग्य संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचं पालन करा. बर्ड फ्लू हा गंभीर आजार असून, त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकानं वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. योग्य खबरदारी घेतल्यास आपण या आजारापासून स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करू शकतो. हृदयाशी निगडित आजारांप्रमाणेच, बर्ड फ्लूसारख्या आजारांचं महत्त्व ओळखून वेळेवर प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे.
हे ही वाचा:
Follow Us