मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा किल्ला, उत्तर प्रदेश येथे ‘शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का 2025’ कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवत उपस्थित शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानाने उभे राहिलेल्या आग्रा येथील किल्ल्यात शिवजन्मोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडणाऱ्या विनोद पाटील यांचे आभार मानत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तलवार हाती घेतली, बारा बलुतेदार, अठरापगड जातीतील मावळ्यांना एकत्र केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संबोधनातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे वर्णन केले. औरंगजेबाने आग्रा येथील भेटीवेळी केलेला अपमान सहन न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी भर दरबारात गर्जना केली, त्यानंतर औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवले व तिथून शिवरायांनी चाणाक्षपणे सुटका करुन घेतली, नंतर स्वराज्यात पुन्हा येऊन गेलेले 24 किल्ले परत मिळवले. शिवरायांना नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या रामसिंगची कोठी म्हणजे आताच्या मीना बाजार येथे ताज महालपेक्षाही अधिक पर्यटक भेट देतील, असे स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाचे सैन्य वेतनासाठी लढत असे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे देव, देश आणि धर्मासाठी लढत असत. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी यांनी औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडले आणि दख्खन विजयाचे स्वप्न घेऊन महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच खोदण्यात आली. त्या औरंगाबादचे आम्ही छत्रपती संभाजीनगर केले. कारण औरंगजेब आपला पूर्वज नाही, नायक नाही.
छत्रपती शिवाजी महाराज उत्तम प्रशासक होते असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधी रायगडावर आले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा व शक्ती मागितली. यामुळेच आज भारत पुन्हा एकदा जगात प्रतिष्ठा प्राप्त करत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी बलशाली भारताची निर्मिती करत आहेत, तर आम्ही बलशाली महाराष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांच्या 12 किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांसाठी नामांकन दाखल केले आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री योगेंद्र उपाध्याय, खा. राजकुमार चाहर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री अॅड. आशिष शेलार, आ. परिणय फुके, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील, ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारलेले अभिनेता विकी कौशल, ‘छावा’ चित्रपटाचे निर्माते दिनेश विजयन व इतर मान्यवर उपस्थित होते.