काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याविषयी एकेरी उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. याच प्रतिक्रयेचे पडसाद मुंबई, पुणे नागपूरसह राज्यातील विविध ठिकाणी उमटत असून नरेंद्र महाराजांच्या अनुयायींनी आणि भक्तांनी रस्त्यावर उत्तरात आंदोलनाचा छेडले आहे. यावेळी विजय वडेट्टीवार यांचा कडाडून निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे नरेंद्राचार्य महाराजांबद्दल केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.
याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी वडेट्टीवार यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला वोट जिहाद झाला त्यावेळेला या लोकांची थोबाडं शिवली होती का? त्या वेळेला फतवे निघत होते त्यावेळेला हे काही बोलले नाही. मात्र आता या लोकांच्या मनामध्ये भगवा ध्वज हा सलतो आहे. म्हणून हिंदू धर्माच्या विरोधात हे लोक बोलत आहेत आणि काही संघटना हे काम करत असल्याची प्रतिकिया आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी दिली आहे.
अशातच या वक्तव्याचे पडसाद पंढरपूरमध्ये ही उमटताना बघायला मिळाले. नरेंद्र महाराज यांच्या बद्दल अपमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज त्यांच्या सर्व शिष्य गणांनी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलंय. विजय वडेट्टीवार यांनी तातडीने राज्याची माफी मागावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही या आंदोलकांनी दिला आहे.