Devendra Fadnavis: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या सातत्यानं येत आहेत. सत्तास्थापना, खातेवाटप, पालकमंत्रिपदं यावरुन भाजप आणि शिवसेनेत बरीच रस्सीखेच पाहायला मिळाली. त्यानंतर मागील सरकारमधील योजना, प्रकल्पांना स्थगिती दिल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. या सगळ्यावर मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाष्य केलं. माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांचे मथळे सांगत त्यांनी या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं.
‘गेल्या काही काळात आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे. काही झालं की फडणवीसांनी शिंदेंच्या प्रकल्पाला स्थगिती दिली. पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही,’ असं फडणवीस यांनी म्हणताच त्यांच्या मागे बसलेल्या महायुतीच्या आमदारांनी जोरात बाक वाजवले. मागील सरकारमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची जबाबदारी एकट्या शिंदेंची नसून ती आम्हा तिघांची असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.’मी यापूर्वी स्पष्ट केलंय जे जे राज्याच्या हिताचं आहे, ते ते सुरु करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मीदेखील होतो. नंतर दादाही होते. त्यामुळे घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेंची नाही. ती आमच्या तिघांचीही जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी आढळल्या. खालच्या स्तरावर कधीकधी गडबड होते. त्या त्या ठिकाणी चर्चा करुनच स्थगिती दिलेली आहे. आता विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली तरी देवेंद्र फडणवीस यांचा दणका, संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी त्यांच्या विभागातील कामांना केंद्र सरकारच्या निर्देशाने स्थगिती दिली तरी देखील देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती दिली.
मी एक गोष्ट माध्यमांना आणि विरोधकांनाही सांगतो. हे समन्वयाने चालणारं सरकार आहे. या सरकारमध्ये सर्व निर्णय आम्ही तिघंही मिळून घेतो. आता काही बैठकांना आम्ही तिघं असतो, काही बैठकीला मी असतो किंवा काही बैठकीला अजित पवार असतात. मग एखाद्या बैठकीला कोणी गैरहजर असलं की लगेच तो नाराज, मला असं वाटतं की सध्या कॉलिटीच्या बातम्याही दिसत नाहीत आणि विरोधकांना कॉलिटीची टीका करता येत नाहीये”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीसांचा शिंदेंना दणका म्हणतात. पण दादांचं नाव नाही घेत, कारण ते थेट अटॅकच करतात ना. त्यामुळे फार कोणी त्यांच्या वाट्याला जात नाही. पण मी एक गोष्टी सांगतो, हे समन्वयानं चालणारं सरकार आहे. या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिथे समन्वयानं घेतो, असं मुख्यमंत्र्यांन विधिमंडळातील भाषणात सांगितलं.
हे ही वाचा:
Anil Parab : अनिल परबांच्या छत्रपती संभाजी महाराजांची तुलना केल्यामुळे नव्या वादाला सुरुवात