मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन या स्टेटमेंटवर त्यांची बरीच चेष्टा झाली, मस्करी झाली, सोशल मीडियावर त्यांना बरच ट्रोल देखील करण्यात आलं. अगदी सहा महिन्यांपूर्वी लोकसभेला आपल्या पक्षाच्या झालेल्या पानिपताची, पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि अवघ्या सहा महिन्यात तेल लावलेल्या पैलवानापासून ते पक्षफुटीच्या इमोशनल पॉलिटिक्सला पुरून उरत त्यांनी महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत बसवलं. एवढेच नाही तर पराभवाच्या जखमा भरून काढत १३२ आमदारांचा रेकॉर्ड ब्रेक आकडा भाजप पक्षाला मिळवून दिला. होय… राजकीय संकटांचा कर्दनकाळ ठरत तो पुन्हा आलाय. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… ही घोषणा पुन्हा एकदा आसमंतांत घुमेल आणि भाजपच्या पडझडीपासून ते पुन्हा एकदा पक्षाला महाराष्ट्रात शिखरापर्यंत घेऊन जाण्याचं एक वर्तुळ पूर्ण होईल.
महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे. मी हरणारा नाहीये, ताकदीनं मैदानात उतरणार. मला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं. पाच जूनच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा पराभवानंतर केलेलं हे स्टेटमेंट. फडणवीस का जादू खत्म हो गया, फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीचा दी एंड, असं म्हणून अनेक लेख छापण्यात आले. सोशल मीडियावर तर फडणवीस हा शब्द चेष्टेचा विषय बनला. तो दिवस ते आजचा दिवस मागच्या सहा महिन्यात राजकीय विश्लेषकांच्या अंदाजाला घरचा रस्ता दाखवत महाराष्ट्राचं राजकारण ३६० अंशात फिरलं आणि तो पुन्हा एकदा आलाच. पहाटेचा फसलेला शपथविधी फक्त ८० तासांचाच द्यावा लागलेला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा शिवसेनेत फूट घडवून आणूनही उपमुख्यमंत्री पदावर झालेली बोळवण, लोकसभेला भाजपचा झालेला दारूण पराभव अशा एकामागून एका अपयशाची, दुःखाची राजकीय पायपीठ तुडवत फडणवीस मात्र चालत राहिले. अगदी शांतीत क्रांती करत आपल्याला उगाच राजकीय चाणक्य म्हणत नाहीत हे त्यांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. पण फडणवीस यांच्या या राजकीय झंजावाताची सुरुवात झाली, वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी.
देवेंद्र फडणवीस यांचे वडील भाजपचे धडाडीचे नेते गंगाधर फडणवीस हे भाजपमधलं मोठं नाव. विधान परिषदेचे आमदार राहिलेल्या गंगाधर फडणवीस यांचं निधन झालं, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं वय होतं अवघं १७ वर्ष. घरात जनसंघाचं वातावरण असणारे देवाभाऊ शिक्षणातही जाम हुशार. कॉमर्स आणि नंतर एलएलबीचं शिक्षण करून वकील बनलेल्या फडणवीसांनी विद्यापीठाचं गोल्ड मेडल गळ्यात घातलं. मात्र त्यांची ऑफिशियली राजकारणात एंट्री झाली ती १९९२ या साली. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी. नागपूर महापालिकेचा नगरसेवक म्हणून फडणवीस यांनी पहिल्यांदा गुलाल कपाळाला लावला. तेव्हा कोणी विचार देखील केला नसेल की हे तरुण बांड पोर पुढे जाऊन महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होईल. फडणवीसांनी विधानसभेची पायरी चढली ती १९९९ साली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, तेलगी घोटाळा, सिंचन घोटाळा, क्रिमिलियरची मर्यादा वाढवणं, अशा अनेक प्रकरणावरून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला अक्षरशः घाम फोडला. २०१३ ला भाजप प्रदेशाध्यक्ष आणि २०१४ ला मुख्यमंत्रीपद त्यांच्या वाट्याला आलं आणि त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळून गेली.
नितीन गडकरी, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील अशा सगळ्या फळीला ओव्हरटेक करत फडणवीस मुख्यमंत्री झाले. २०१९ च्या इलेक्शनपर्यंत तर देवेंद्र फडणवीस हे भाजपमधील बिग बॉस झाले होते. देवेंद्र फडणवीस यांना दुखवणं म्हणजे स्वतःच्या हातानं पायावर दगड पाडून घेण्यासारखा कार्यक्रम होता. फडणवीस यंत्रणा कामाला लागली आणि २०१९ ला पक्षाच्या १०५ जागा निवडून आल्या. मात्र, ठाकरे आघाडीच्या गळाला लागल्यानं भाजपची आणि पर्यायाने फडणवीसांची मोठी राजकीय कोंडणी झाली. मात्र मागच्या पाच वर्षात अनेक चढ उतार झेलत फडणवीसांनी आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. मुद्देसूद मांडणी अभ्यासपूर्ण विश्लेषण मापात बोलायचं पण कामाचं बोलायचं. विरोधकांना फारस सिरीयसली न घेणं, नेतृत्व क्षमता हे आपलं स्किल वापरत राजकारणाच्या एकामागून एक पायऱ्या चढत फडणवीस सध्या बिग बॉस ठरलेत. महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काळात ज्या काही वादळी नावांचा उल्लेख केला जाईल, त्यात फडणवीस टॉप थ्री मध्ये असतील एवढं मात्र नक्की.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंना विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचं मिश्किल उत्तर | Ajit Pawar | Eknath Shinde