Dhananjay Deshmukh: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. परळी तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो कोर्टातील चार्जशीटच्या वेळी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचले आणि त्यातून महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हत्येनंतर झाला नाही, एवढा प्रचंड संताप व्यक्त केला गेला. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला या खुनाच्या घटनेतील आरोपी वाल्मीक कराड व त्याच्या टोळीतील इतर आरोपी यांच्या विषयी प्रचंड संतापाची भावना आहे. त्यातच धनंजय मुंडे अगोदर राजीनामाही देत नव्हते आणि त्यांना सह आरोपी देखील केले जात नाही म्हणून सगळीकडे संतापाची भावना आहे. हाच संतापाचा हुंकार आज बारामतीत उमटला.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत राज्यभर मोर्चे निघत आहेत. आज बारामती शहरामध्ये सर्वधर्मीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख सहभागी झाले होते. यावेळी धनंजय देशमुख यांना भावाच्या आठवणीने अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तीन महिने पूर्ण झालेत. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या बारामतीमध्ये आज निषेध मोर्चा काढण्यात आला होता. आज याची सुरुवात बारामतीतील कसब्यातील छत्रपती शिवाजी उद्यानातून झाली. या मोर्चामध्ये गर्दी प्रचंड झाली होती. मराठा आरक्षणासाठी व कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या बारामतीतील मोर्चाप्रमाणेच हा देखील एक मोर्चा होता. या मोर्चामध्ये बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर, फलटण या तालुक्यातील नागरिक सहभागी झाले होते. महिलांची, युवक, युवतींची देखील संख्या लक्षणीय होती. हा मोर्चा गुणवडी चौकामार्गे मारवाड पेठेतून गांधी चौक व सुभाष चौक मार्गे भिगवण चौकात आला. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. या मोर्चात युवतींनी प्रातिनिधिक स्वरूपात भाषण केले. यामध्ये धनंजय मुंडे यांना या घटनेत सहआरोपी करावे अशी मागणी केली. कारण धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाशिवाय या मंडळींचे पानही हालत नव्हते. त्यामुळे मुंडे यांच्या राजकीय सत्तेमुळेच आरोपींचे क्रूर खुनाचे धाडस निर्माण झाले असा आरोप या सभेत करण्यात आला. आपल्या बंधूंसाठी जमा झालेली हजारोंची गर्दी पाहून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना मंचावर अश्रू अनावर झालेत. कार्यक्रम संपला त्यावेळी उपस्थिती गर्दी पाहून धनंजय देशमुख हे मंचावर ढसाढसा रडले.
आज खरं तर धनंजय देशमुख यांचा वाढदिवस आहे. मात्र आपल्या बंधूंच्या जाण्याने त्यांची पोकळी मी कधीच भरून काढू शकत नाही अशी प्रतिक्रिया ही धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मंचावरील संतोष देशमुख यांचा फोटो पाहून धनंजय देशमुख अक्षरशा ढसाढसा रडले. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या फोटोच्या पुढे ते नतमस्तक देखील झाले. संतोष देशमुख आणि वैभवी देशमुखांचे दुःख पाहून मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक बारामतीकराचे डोळे पाणावले.
“बीड जिल्ह्यात नेमकं काय घडलं आहे हे इथल्या अनेकांना माहित नाही. राजकीय पाठबळ नेमकं कोणाला दिलं जात आहे. एका सामान्य माणसाला कसं संपवलं गेले, मी न्यायाची भीक मागत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने घ्यावे. आमच्या सोबत कायम रहा,आमच्याकडून काहीही चुकणार नाही,” असे आवाहन धनंजय देशमुख यांनी केले. तसेच “वाल्मीक कराड सांगेल तोच गुन्हा दाखल होतो अशी बीड जिल्ह्यात परिस्थिती आहे. आज देखील भीतीयुक्त वातावरण आहे. यांचं खूप मोठ गुन्हेगारीचे जाळ आहे. आमच्या सोबत कायम रहा, आमच्याकडून काहीही चुकणार नाही. न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, राजकीय पुढाऱ्यांनी कुठे हस्तक्षेप केला याचे पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार..” असंही धनंजय देशमुख म्हणाले.
Follow Us