महापालिका, नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरात तयारी सुरु असून आजपासून दोन दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाने नवसंकल्प अधिवेशन आयोजित केले आहे. हे अधिवेशन शिर्डीत पार पडत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या अधिवेशनाची सुरूवात झाली आहे.
या अधिवेशनात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सगळेच नेते उपस्थित होते मात्र राष्ट्रवादी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे अधिवेशनाच्या पहिलीच दिवशी उपस्थित नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत यांच्या कार्यालयाकडून ते येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती परंतु धनंजय मुंडे यांची आज अनुपस्थिती लागली आहे.
सतीश चव्हाण यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश
एकीकडे मंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला पहिल्याच दिवशी अनुपस्थिती तर दुसरीकडे शरद पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे . आज शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात शरद पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे उमेदवार सतीश चव्हाण हे आज अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या अधिवेशनाकडे लागले आहे.
सतीश चव्हाण यांची विधानपरिषदेची आमदारकी रद्द करावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधीमंडळाला दिलेले पत्र माघारी घेतले आहे. त्यामुळे सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला असून ते या दोन दिवसीय अधिवेशनाला देखील उपस्थिती लावणार आहेत आणि पुन्हा एकदा ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे २ दिवसीय शिबिराचे वेळापत्रक समोर आले असून पहिल्या दिवशी या अधिवेशनात सुनील तटकरे, संदीप चव्हाण, माजी मंत्री सुबोध मोहिते, अभिनेते सयाजी शिंदे, नजीब मुल्ला, सिद्धार्थ कांबळे, नवाब मलिक हे उपस्थित राहणार आहेत तर दुसऱ्या दिवशी अभिजीत करंडे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अजित पवार आणि विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ हे नेते उपस्थित असणार आहेत.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती