spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने थेट पंचाला मारली लाथ; महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शेवटच्या दिवशी गालबोट लागले. गादी विभागातील अंतिम लढतीत पराभूत घोषित केल्याचा पंचाचा निर्णय अमान्य करत नांदेड येथील पैलवान शिवराज राक्षे याने आखाड्यातच पंचाची कॉलर पकडली. त्यांना लाथही मारली. त्यामुळे कुस्तीच्या मैदानावर एकच गोंधळ उडाला. याप्रसंगी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत शिवराज राक्षे व त्याच्या सहकाऱ्यांना मैदानाबाहेर काढले. तसेच घडलेल्या या प्रकरानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले . पण शिवराज राक्षेने थेट पंचाला का मारली लाथ? कुस्तीनंतर तुफान राडा. काय घडलं नेमकं बघुयात.

अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरी सामन्यात तुफान राडा पाहायला मिळाला. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने थेट पंचाची कॉलर धरून त्यांना लाथेने मारल्याची धक्कादायक घटना काल भर मैदानात झाली. मॅट विभागातील उपांत्य सामना हा पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात झाला. पण याच सामन्याचा निकालानंतर शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारणारं अशोभनीय कृत्य केलं.

महाराष्ट्र केसरीचा उपांत्य सामना हा अत्यंत अटीतटीचा झाला. ज्यामध्ये अगदी शेवटच्या क्षणी पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षेला पाठीवर आणलं. ज्यानंतर पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केलं. तेव्हा शिवराज राक्षे हा फारच संतापला. कारण आपली पाठ पूर्णपणे टेकलेली नसतानाही पंचांनी बाद ठरवला. तसंच त्यांचं फेर अपील मागणी देखील ऐकण्यात आली नाही. त्यामुळे शिवराज राक्षे प्रचंड संतापला.

यावेळी शिवराजने पंचांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. पण अचानक शिवराजने एका पंचाची कॉलरच धरली. त्यानंतर तेथील उपस्थित आयोजकांनी मध्यस्थी करून त्याला दूर लोटलं. पण शिवराजला राग एवढा अनावर झाला की, त्याने थेट त्या पंचाला लाथच मारली. ज्यामुळे मैदानात बराच राडा झाला. अखेर आयोजकांनी आणि पोलिसांनी शिवराजला तेथून बाजूला नेलं.

या सगळ्यानंतर शिवराजने म्हंटले, पंचाने विरोधी मल्लाला विजयी घोषित केले तेव्हा मी या निर्णयावर आक्षेप नोंदविला होता. आक्षेपानंतर कुस्तीचा निर्णय देता येत नाही. मात्र, माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले. मल्लाचे दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले असेल तरच त्याला पराभूत घोषित केले जाते. माझे दोन्ही खांदे जमिनीवर टेकलेले नव्हते आणि जर खांदे जमिनीवर टेकल्याचे चित्रीकरणात दिसले तर मी हार मानायला तयार आहे. आम्ही या स्पर्धेसाठी वर्षभर मेहनत घेतो, पंचांनी माझ्यावर अन्याय केला, अन्याय माझ्यावर झालाय ना तर देव त्याच्याकडे बघून घेईल. 100 टक्के ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्यांना भेटणार आहे. पुणे जिल्ह्याचा व्यक्ती ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून तर माझ्यावर अन्याय झाला आहे.

शिवराजचे निलंबन केले तसे पंचांना ही शिक्षा करा, अशी मागणी शिवराजच्या आईने केलीये. तर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मॅच फिक्सिंग होते, असा गंभीर आरोप शिवराजच्या वहिनींनी केलाय.

वादावर आणि पंचाच्या निर्णयावर पृथ्वीराज मोहोळने स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, तो पंचांचा निर्णय आहे, त्यावर मी काही बोलू शकत नाही. मी पण एक खेळाडू आहे. मी माझं काम करून दाखवला आहे, तो त्यांचा प्रश्न आहे ते बघतील त्यांना काय करायचं. पण पंचांचा निर्णय अंतिम असतो. माझ्यासोबत ही मागच्या वेळी असंच घडलं होतं. पण मी हार मानली नाही. यंदा आलो आणि जिंकून दाखवलं.

पृथ्वीराज मोहोळ याने महाराष्ट्र केसरी किताबाचा मान पटकाविला आहे. त्याने अंतिम सामन्यात सोलापूर जिल्ह्यातील महेंद्र गायकवाडचा पराभव केला. तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड ठरला आहे. पण, महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम लढत वादग्रस्तच ठरली. पृथ्वीराजला एक गुण देण्याचा निर्णय न पटल्याने अखेरची 16 सेकंदआधीच महेंद्रने मैदान सोडले आणि बाहेर गेला, त्यामुळे पंचांनी पुणे जिल्ह्यातील पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. महेंद्र गायकवाडचा पराभव झाल्यानंतर तो पण पंचाच्या अंगावर धावून गेला. कारण त्याने शेवटच्या गुणाबद्दल त्याच्या प्रशिक्षकांचा आक्षेप होता.

हे ही वाचा :

CIDCO च्या २६००० घरांच्या अर्जदारांची यादी ३ फेब्रुवारीला होणार प्रकाशित; सोडत कधी होणार जाहीर?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा 

Latest Posts

Don't Miss