भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (२६ डिसेंबर) वृद्धापकाळाने निधन झालं. दिल्ल्तील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री ९.४१ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहिलं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातील दिग्ग्जांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.”अत्यंत साधे, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक स्तरावर एक ख्यातनाम अर्थतज्ञ म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि बुद्धिमान अर्थतज्ञ आणि राजकीय नेता हरपला आहे. असे एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांची संपूर्ण पोस्ट
देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दु:खदायक आहे. आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील. अत्यंत साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉ.मनमोहन सिंह हे एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असे अर्थतज्ज्ञ, राजकीय नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याकरता बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
दरम्यान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात ७ दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार आहे. तसेच आज सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका