शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी असलेले डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावर मेहकर उपविभागीय दंडाधिऱ्यांनी एका वर्षासाठी ६ जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई केली. ही कारवाई प्रशासनाने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या दबावावरून करण्यात आल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला आहे. सोमवारी तुपकर यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रतापराव जाधव यांच्या विरुद्ध दंड थोपटले.
तडीपार करण्यात आलेले डॉ. ज्ञानेश्वर टाले हे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात गेल्या तेरा वर्षापासून शेतकरी चळवळीत काम करीत असून, ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. राजकीय आकसापोटी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना अपक्ष असूनही मेहकर मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या बरोबरीत मते मिळाली. यामध्ये डॉ. ज्ञानेश्वर टाले यांचे महत्त्वाचे योगदान ठरले.
त्यामुळे आकसापोटी प्रतापराव जाधव यांनी ही कारवाई करायला लावली. आता हे सहन करण्यापलीकडे असून, येत्या काळात जाधवांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे तुपकर यांनी जाहीर केले. डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना विभागीय आयुक्तांनी तडीपारीवर २७ मार्च पर्यंत स्टे दिला आहे. यामधील अधिकाऱ्याला आम्ही न्यायालयात खेचणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
Follow Us