spot_img
Thursday, March 20, 2025

Latest Posts

प्रशांत कोरटकरांकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु, गोपनीय सूत्रांची माहिती

कोल्हापूर येथील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला होता. या धमकीच्या फोनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती. इंद्रजीत सावंत यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रशांत कोरटकर असल्याचा दावा केला होता. यानंतर त्यांनी कोल्हापूर पोलिसात तक्रार दिली होती. ही घटना उघडकीस आली तेव्हा प्रशांत कोरटकरांनी तो आवाज आपला नसल्याचं म्हटलं होत. मात्र त्यानंतर ते फरार झाले. या प्रकरणी कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांच्या पथकाकडून फरार प्रशांत कोरटकर यांचा शोध सुरु आहे. अद्याप प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती सापडलेले नाहीत. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार प्रशांत कोरटकरांकडून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु आहे. सुरवातीला तो आवाज आपला नाही म्हणणारे कोरटकर फरार का झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

नेमकं काय प्रकरण?

24 फेब्रुवारीच्या रात्री प्रशांत कोरटकर नावाने इंद्रजीत सावंत यांना धमकीला फोन आला. सावंत यांनी 25 फेब्रुवारीच्या सकाळी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्याला प्रशांत कोरटकरनं धमकी दिल्याचा दावा केला. यासोबत ऑडिओ क्लीप देखील शेअर केली. सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल होताच प्रशांत कोरटकर यांना राज्यभरातून फोन यायला सुरुवात झाली. सकाळी मुलीला परीक्षा केंद्रावर सोडायला जात असताना प्रशांत कोरटकर यांनी मीडियाशी बोलून तो आवाज आपला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून आपल्याला धमकी येत असल्याचे सांगत सुरक्षेची मागणी केली. खबरदारी म्हणून नागपूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांच्या मनीषनगर येथील घरावर पोलिसांचा बंदोबस्त लावला.

प्रशांत कोरटकरांचा फोन 25 तारखेपासून बंद
25 फेब्रुवारील मुलीला परीक्षा केंद्रावर सोडायला गेल्या नंतर प्रशांत कोरटकर घरी परतले नाहीत. 25 फेब्रुवारीच्या दुपार नंतर त्यांनी आपला फोन बंद केला. प्रशांत कोरटकर हे शिवनी,बालाघाट मार्गे मध्य प्रदेशला गेले. यानंतर त्यांनी पुढे देवदर्शन केल्याची माहिती आहे.

सध्या प्रशांत कोरटकर यांचे फोन बंद असून ते एका ठिकाणी खूप वेळ मुक्काम करत नाहीत. सतत प्रवास करत असून या प्रवासात त्यांचे देवदर्शन व पर्यटन करत पोलिसांना हुलकावणी देत आहेत. सध्या नागपूर पोलिसांची दोन पथकं आणि कोल्हापूर पोलिसांचं एक पथक अशी तीन पथकं प्रशांत कोरटकर यांचा शोध घेत आहे. प्रशांत कोरटकर हे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळत आहे. तो आवाज प्रशांत कोरटकर यांचा नाही तर ते फरार का आहेत? प्रशांत कोरटकर आपल्या आवाजाचे नमुने पोलिसांना देवून या प्रकरणाची वस्तुस्थिती पुढे आणायला पोलिसांना सहकार्य का करत नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Latest Posts

Don't Miss